Water Crisis Pudhari
नाशिक

Sinnar Water Crisis 2026 | बोरखिंड वगळता धरणे कोरडीठाक

Sinnar Water Crisis 2026 | सिन्नर तालुक्यावर भीषण टंचाईचे सावट; पाणीपुरवठा योजना धोक्यात

पुढारी वृत्तसेवा

सिन्नर : संदीप भोर

तालुक्यात यंदा उन्हाळ्याच्या अखेरीस पाणीटंचाईने गंभीर स्वरूप धारण केले असून, तालुक्यातील बहुतांश लघुधरणांनी तळ गाठला आहे. भोजापूर मध्यम प्रकल्पासह बोरखिंड, उंबरदरी, सरदवाडी, कोनांबे, दातली, माळवाडी आणि दुशिंगवाडी या महत्त्वाच्या जलसाठ्यांमध्ये केवळ मृत पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह शेती आणि पशुधनासमोरील संकट अधिक गडद होत चालले आहे.

तालुक्यातील अनेक प्रादेशिक पाणीपुरवठा योजना या धरणांवर अवलंबून आहेत. मात्र धरणांमधील जलसाठा संपुष्टात येत असल्याने संबंधित गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. परिणामी, प्रशासनाला टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आली असून, दिवसेंदिवस टँकरची संख्या वाढत आहे. बोरखिंड धरणात सध्या सुमारे दहा दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक असला तरी तोही अत्यल्प मानला जात आहे.

या धरणावरून परिसरातील अनेक गावांच्या स्थानिक पाणीपुरवठा योजना चालतात. उंबरदरी धरणावर ठाणगावसह पाच गावांची पाणीपुरवठा योजना अवलंबून आहे. सरदवाडी धरणातून जामगाव, लोणारवाडी, भाटवाडी, सरदवाडीसह अनेक गावांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र या धरणानेही तळ गाठल्याने पाणीपुरवठा विहिरींची पातळी लक्षणीयरीत्या खालावली आहे.

दातली, माळवाडी आणि दुशिंगवाडी येथील बंधाऱ्यांमध्येही सध्या अत्यल्प पाणी शिल्लक आहे. हे जलसाठे नियमितपणे भरत नसले तरी गतवर्षी झालेल्या चांगल्या पावसामुळे येथे समाधानकारक पाणीसाठा झाला होता. मात्र यंदा उन्हाळ्याच्या अखेरीस सर्वच साठे संपुष्टात आल्याचे चित्र आहे. सध्या तालुक्यातील आठ ते दहा गावे आणि सुमारे 80 वाड्या-वस्त्यांवर टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

पावसाने आणखी काही दिवस दडी मारल्यास ही संख्या झपाट्याने वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शेतीसाठी पाणी उपलब्ध नसल्याने खरीप हंगामाच्या तयारीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. दुसरीकडे पशुधनासाठी चारा आणि पाणी या दोन्हींची टंचाई निर्माण झाल्याने शेतकऱ्यांसमोर जनावरे जगविण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

ग्रामीण भागात विहिरी, बोअरवेल आणि शेततळी कोरडी पडू लागल्याने दुष्काळाची दाहकता अधिक तीव्र होत आहे. तालुक्यातील बोरखिंड धरण वगळता बहुतांश लघुधरणे कोरडीठाक पडली असून, प्रशासनाने तातडीने दीर्घकालीन व अल्पकालीन उपाययोजना राबविण्याची गरज व्यक्त होत आहे. आगामी काही दिवसांत समाधानकारक पाऊस न झाल्यास सिन्नर तालुक्याला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

मृतसाठ्यातूनही पाणी उपसा

शासनाने उपलब्ध पाणीसाठा केवळ पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवण्याचे आदेश दिले असतानाही काही ठिकाणी रात्रीच्या वेळी विद्युत मोटारी लावून पाणी उपसा केला जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे उर्वरित पाणीसाठ्यावरही गदा येत असून, अशा पाणीचोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

धरणांवर अवलंबून असलेली गावे

बोरखिंड परिसरातील स्थानिक गावे, उंबरदरी ठाणगावसह 5 गावे, सरदवाडी जामगाव, लोणारवाडी, भाटवाडी, सरदवाडी व परिसर, दातली, माळवाडी, दुशिंगवाडी स्थानिक पाणीपुरवठा योजना व वाड्या-वस्त्या

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT