Land Acquisition, Nashik file photo
नाशिक

Sinnar Land Acquisition Highway | शेतकऱ्यांच्या समस्या सुटेपर्यंत महामार्गाचे काम रोखणार! आमदार माणिकराव कोकाटे यांचा सिन्नरमध्ये पवित्रा

Sinnar Land Acquisition Highway | आ. कोकाटे यांची ग्वाही; सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्ग भूसंपादन प्रक्रियेला वेग

पुढारी वृत्तसेवा

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा

सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्ग प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लागल्याशिवाय रस्त्याचे काम सुरू होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका घेत आमदार माणिकराव कोकाटे यांनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना ग्वाही दिली. काही बाबींमध्ये शंका असल्यास शेतकऱ्यांनी जमिनीच्या मूल्यांकनानुसार मोबदला स्वीकारून न्यायालयात दाद मागावी, अशी सूचनाही त्यांनी केली.

तालुक्यातील भूसंपादन प्रक्रियेबाबत निर्माण झालेले प्रश्न व शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी सोमवारी (दि. १३) सिन्नर नगर परिषद सभागृहामध्ये विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भूसंपादन अधिकारी तथा निफाडचे उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार सुरेंद्र देशमुख, नगराध्यक्ष विठ्ठल राजे उगले,

उपनगराध्यक्ष हर्षद देशमुख, सिन्नर बाजार समितीचे सभापती श्रीकृष्ण भुमरे, गटविकास अधिकारी अशोक भवारी, हरिभाऊ वरंदळ यांच्यासह बाजार समितीचे माजी सभापती कचरू मामा डावखर, नगरसेवक शेखर गोळेसर, बाळू उगले, पंकज जाधव आदी उपस्थित होते. आमदार कोकाटे यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे सकारात्मक दृष्टीने पाहून निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले.

सर्व शेतकऱ्यांना सर्व्हिस रोड देण्यात येईल व मूल्यांकन पारदर्शक पद्धतीने केले जाईल, अशी ग्वाही दिली. काही सुविधा शासनाकडून उपलब्ध न झाल्यास त्या आमदार निधीतून देण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी सांगितले. गोदा उपसा सिंचन योजनेचे कर्ज सातबारावरून कपात करू नये, अशी शेतकऱ्यांची मागणी मान्य करीत ती कपात होणार नसल्याचे आश्वासन उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी दिले.

आवश्यक तेथे फेरनिवाडे करण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या. बांधकाम व कृषी विभागामार्फत मूल्यांकनानुसार दाखले तयार करून ते प्रांताधिकाऱ्यांच्या नावे काढावेत व त्याची प्रत शेतकऱ्यांना देण्यात यावी, अशी सूचना देण्यात आली. वन विभागाकडून झाडांचे गटानुसार मूल्यांकन करण्यात येईल, अशी माहितीही देण्यात आली. जमिनीच्या दरवाढीचा निर्णय केंद्र व राज्य शासन स्तरावर घेतला जात असल्याने त्याबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घेणे शक्य नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. यावेळी शेकडो प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते.

२२५ हेक्टर क्षेत्र भूसंपादनासाठी निश्चित

निफाड तालुक्यात १०२ हेक्टर, तर सिन्नर तालुक्यात २२५ हेक्टर क्षेत्र भूसंपादनास निश्चित करण्यात आले आहे. न्याय मिळेपर्यंत शेतकऱ्यांसोबत राहणार असून, अन्याय झाल्यास रस्त्याचे काम सुरू होऊ देणार नाही, असा इशारा आमदार माणिकराव कोकाटे यांनी दिला.

सिन्नरच्या १३ गावांतून जाणार ३१ किमी महामार्ग

तालुक्यातील देशवंडी, पाटपिंप्री, बारागाव पिंप्री, गुळवंच, देवपूर, खोपडी बु., फर्दापूर, धारणगाव, भोकणी, पांगरी बु., पांगरी खु., फुलेनगर व वावी या १३ गावांमधून सुमारे ३१ किमी लांबीचा महामार्ग जाणार आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी आपल्या विविध मागण्या प्रशासनासमोर मांडल्या

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT