Ashok Kharat | भोंदू खरातवर आता खुनाचा आरोप! 
नाशिक

Nashik Political Crisis | भोंदू खरात प्रकरणी आरोप-प्रत्यारोपांची चिखलफेक

Nashik Political Crisis | उदय सांगळेंना सहआरोपी करून 'एसआयटी' मार्फत चौकशी व्हावी

पुढारी वृत्तसेवा

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा

भोंदू कॅप्टन अशोक खरात प्रकरणामुळे सिन्नर तालुक्याची मोठ्या प्रमाणात बदनामी झाली असून, या प्रकरणामागील पाठबळाचा शोध घेण्याची गरज असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे नगरसेवक तथा आमदार माणिकराव कोकाटे यांचे समर्थक पंकज जाधव यांनी व्यक्त केले.

या प्रकरणात भाजप युवा नेते उदय सांगळे यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी जाधव यांनी पत्रकार परिषदेत केली. तत्कालीन जलसंपदामंत्री जयंत पाटील व पालकमंत्री दादा भुसे यांच्या कार्यकाळात उदय सांगळे यांनी पाठपुरावा करून शिवनिका संस्थानला विविध विकासकामांसाठी निधी मिळवून दिला.

मिरगाव येथील पाण्याच्या टाकीसाठी मंजूर करण्यात आलेला सुमारे ८६ लाख रुपयांचा निधी खासगी मंदिर परिसरात वापरण्यात आल्याने गाव पाण्यापासून वंचित राहिल्याचा आरोपही त्यांनी केला.

तसेच, खनिज विकास निधीतून सुमारे एक कोटी रुपयांचा रस्ता मंदिर परिसरासाठी करण्यात आल्याचे, तसेच श्री सिद्धक्षेत्र ईशान्येश्वर देवस्थानासाठी सुमारे ७२ लाख ४० हजार रुपयांचा निधी विविध कामांसाठी मंजूर झाल्याचे सांगत, सार्वजनिक निधीचा अपव्यय झाल्याचा आरोप जाधव यांनी केला.

या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी झाल्यास आणखी बाबी उघड होतील, असा दावा त्यांनी केला. याशिवाय, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी ईशान्येश्वर मंदिरात पूजा-अर्चा प्रकरणातही उदय सांगळे यांचा सहभाग असल्याचा आरोप त्यांनी केला. या पत्रकार परिषदेस नगराध्यक्ष विठ्ठलराजे उगले, नगरसेवक अजय गोजरे तसेच प्रवीण जाधव, दत्ता हांडे, योगानंद गवळी आदी उपस्थित होते.

कबड्डी स्पर्धेला निधी शासनाचा, पण...

दरम्यान, सांगळे यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेवरही जाधव यांनी टीका केली. शासनाचा निधी खर्च होत असतानाही संबंधित बॅनर व जाहिरातींमध्ये क्रीडामंत्रिपद सांभाळत असलेल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच स्थानिक आमदार माणिकराव कोकाटे अशा प्रमुख नेत्यांचे फोटो नसल्याने स्पर्धा वैयक्तिक खर्चातून होत असल्याचा भास निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले. या बाबीकडे शासनाने लक्ष द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT