शहरातील परीट गल्ली परिसरात दुचाकी पार्किंगसारख्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर भीषण हत्येत झाले आहे. रविवारी रात्री घडलेल्या या घटनेत आरोपीने धारदार शस्त्राने दोघांवर जीवघेणा हल्ला केला, ज्यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सिन्नर पोलिसांनी वेगाने चक्र फिरवत आरोपीला जेरबंद केले आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
sharp weapon attack on two persons due to two wheeler Parking Dispute
सिन्नर : शहरातील परीट गल्ली येथे दुचाकी पार्किंगच्या किरकोळ कारणातून झालेल्या वादातून एका व्यक्तीचा खून झाल्याची घटना रविवारी (दि. २९) रात्री घडली. या प्रकरणातील आरोपीला सिन्नर पोलिसांनी तत्काळ अटक केली.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, राकेश दशरथ जाधव (३६) आणि गौरव दशरथ जाधव (३९) यांच्या शेजारी राहणारे त्यांचे भाऊबंद बंडू अशोक जाधव (४२, रा. परीट गल्ली, सिन्नर) याच्याबरोबर रात्री १० च्या सुमारास दुचाकी पार्किंगवरून वाद झाला होता. या वादातून बंडू जाधवने धारदार शस्त्राने दोघांवर हल्ला करत त्यांना गंभीर जखमी केले.
जखमींना तातडीने सिन्नर येथील रुग्णालयात प्राथमिक उपचार देऊन पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले. त्यापैकी गौरव जाधव यांचा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला, तर राकेश जाधव यांच्यावर श्रीजी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांनी पथक तयार करून तपासाला वेग दिला. जखमी राकेश जाधव यांच्या जबाबावरून आरोपीविरोधात खून व खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेनंतर पसार झालेल्या आरोपीचा शोध घेऊन पोलिसांनी त्याला तत्काळ अटक केली. ही कारवाई पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलिस अधीक्षक आदित्य मिरखेलकर व उपविभागीय पोलिस अधिकारी कांतिलाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
पोलिस पथकात पोलिस उपनिरीक्षक रमेश पाटील, संजय गोसावी, पोलिस हवालदार नवनाथ पवार, समाधान बोराडे, रवींद्र गवंडी, नितीन डावखर, धनाजी जाधव, गणेश वराडे, हरीश आव्हाड, मनीष मानकर, जालिंदर चौगुले, राहुल इंगोले, पोलिस नाईक विलास बिडगर, भारत पवार, पोलिस शिपाई विनोद टिळे, कृष्णा कोकाटे, साईनाथ नागरे, आप्पासाहेब काकड, प्रशांत सहाणे, विष्णू तवार व महेंद्र खामकर यांचा समावेश होता. पोलिस उपनिरीक्षक रमेश पाटील अधिक तपास करत आहेत.