सिन्नर ( नाशिक ) : संक्रांत सणानिमित्त शहरात नायलॉन मांजा विक्रीला आळा घालण्यासाठी सिन्नर नगर परिषद प्रशासनाने धडक मोहीम राबवली. मुख्याधिकारी अभिजित कदम यांच्या निर्देशानुसार अधिकारी- कर्मचारी व पोलिसांचे असे चार पथक तयार करण्यात आले होते.
या पथकांनी शहरातील तीन ठिकाणी छापे टाकत एकूण 75 हजार 300 रुपये किमतीचा नायलॉन मांजा जप्त केला. सध्या पतंगोत्सवाचा उत्साह वाढत असताना नायलॉन मांजामुळे होणार्या जखमा, पक्षीप्राण्यांचे जीवितहानीचे प्रकार आणि वाहतूक अपघात वाढल्याने ही मोहीम हाती घेण्यात आली. मागील काही वर्षांत साध्या मांजाऐवजी धारदार नायलॉन मांजाचा वापर वाढल्याने धोका अधिक गंभीर बनला आहे. अशाच प्रकारात नुकतीच संगमनेर नाका परिसरात एका बाइकस्वाराला नायलॉन मांजा गळ्यात अडकून दुखापत झाल्याची घटना घडली. मोहिमेदरम्यान प्रमोद रमेश मोरे यांच्या दुकानातून 6 मोठ्या व 60 लहान अशा रीळांचा साठा, तर प्रशांत बसंतलाल हलवाई यांच्या राहत्या घरातून 141 रीळ नायलॉन मांजा आढळून आल्याने या दोघांविरुद्ध सिन्नर पोलिस ठाण्यात थेट गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मोहीम सुरूच राहणार असल्याचे मुख्याधिकारी कदम यांनी सांगितले.
यापुढे शहरात कोणीही नायलॉन मांजा विक्री-खरेदी करू नये, नियम मोडणार्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.अभिजित कदम, मुख्याधिकारी