सिन्नर : पुढारी वृत्तसेवा
शहरानजीक असलेल्या सरदवाडी धरणाची तब्बल ४० वर्षांनंतर दुरुस्ती हाती घेण्यात आली आहे. पाटबंधारे विभागाने आपत्ती सौमिकीकरण निधीअंतर्गत सुमारे ३८ लाख रुपयांची तरतूद केली आहे.
या निधीतून धरणाच्या भिंतीची दुरुस्ती, माती व मुरूम भराव, पिचिंग तसेच कालवा गेटचे अस्तरीकरण आदी कामे युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहेत. सरदवाडी धरणाचे बांधकाम १९८६ च्या सुमारास पूर्ण झाले होते. गेल्या काही वर्षांत धरणाला गळती लागली होती तसेच धरणाची अवस्था दयनीय झाली होती.
सुमारे पाच ते सहा वर्षांपूर्वी धरणातील मोठ्या प्रमाणातील गाळ उपसा करण्यात आल्यामुळे त्याच्या साठवण क्षमतेत लक्षणीय वाढ झाली होती. मात्र, आवश्यक दुरुस्तीच्या अभावामुळे पाणीगळती सुरूच होती आणि धरणाच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर धरणाची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी परिसरातील शेतकरी आणि नागरिकांकडून वारंवार केली जात होती.
अखेर पाटबंधारे विभागाने या मागणीची दखल घेत दुरुस्तीची कामे सुरू केली आहेत. सध्या १० ते १५ मजुरांच्या मदतीने तसेच पोकलेन आणि डंपरच्या साहाय्याने धरणाच्या भिंतीवर मुरूम व मातीचा भराव टाकण्याचे काम सुरू आहे. पिचिंगसह इतर संरक्षक उपाययोजनाही करण्यात येत आहेत. मात्र, ऐन पावसाळ्याच्या तोंडावर काम सुरू झाल्याने अचानक जोरदार पाऊस झाल्यास कामाच्या गतीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सिंचन, पाणी साठवण क्षमतेत वाढ होण्याची अपेक्षा
तब्बल चार दशकांनंतर धरणाच्या दुरुस्तीला सुरुवात झाल्यामुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. दुरुस्तीमुळे धरणाची सुरक्षितता वाढण्याबरोबरच भविष्यातील पाणी साठवणूक आणि सिंचन व्यवस्थेलाही फायदा होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दुरुस्तीचे काम वेगाने सुरू आहे. लवकरात लवकर काम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आपत्ती सौमिकीकरण योजनेंतर्गत ३८ ते ४० लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून, त्यातून ही दुरुस्ती केली जात आहे.- बी. के. आचट, शाखा अभियंता, पाटबंधारे विभाग