सततच्या अवकाळी पावसाने भातपिके धोक्यात Pudhari
नाशिक

Sinnar Rain Update | नांदूर शिंगोटे परिसरात दमदार पावसाने बळीराजा सुखावला

Sinnar Rain Update | ६० मिमी पावसाची नोंद; खरीप पेरण्यांना वेग, बियाणे खरेदीसाठी गर्दी

पुढारी वृत्तसेवा

नांदूर शिंगोटे : पुढारी वृत्तसेवा

सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोटे व परिसरात गेल्या तीन दिवसांपासून झालेल्या समाधानकारक पावसामुळे शेतकरी वर्गात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या - बळीराजाला अखेर दिलासा मिळाल्याने खरीप हंगामातील पेरण्यांना आता वेग येण्याची चिन्हे आहेत.

मंगळवारी (दि. ७) सकाळपर्यंत परिसरात सुमारे ६० मिमी पावसाची नोंद झाली असून, शेतकरी पेरणीच्या तयारीला लागले आहेत. यंदा पावसाने उशिरा हजेरी लावल्यामुळे शेतकरी चिंतेत होते. मात्र गेल्या तीन दिवसांतील सलग पावसामुळे जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाला. आहे. पाऊस उघडताच मोठ्या प्रमाणात पेरणीला सुरुवात होईल, असा विश्वास शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

त्यामुळे कृषी सेवा केंद्रांवर बियाणे व खतांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी वाढली आहे. काही शेतकरी बियाण्यांची खरेदी करीत आहेत. यंदा परिसरातील शेतकऱ्यांचा कल प्रामुख्याने सोयाबीन, मका आणि बाजरी या पिकांकडे दिसत आहे. जनावरांच्या चाऱ्याची गरज लक्षात घेऊन अनेक शेतकरी मकालागवडीला प्राधान्य देत असल्याचे चित्र आहे.

दरम्यान, गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा अद्याप नद्या - नाल्यांना अपेक्षित पूर आलेला नाही. दमदार पाऊस झाल्यास नदी नाले वाहू लागतील आणि खरीप हंगामाला अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत. गेल्या वर्षी याच कालावधीत बहुतांश पेरण्या पूर्ण झाल्या होत्या आणि नदी-नाले दुथडी भरून वाहात होते. यंदा मात्र अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

भोजापूरमध्ये पाण्याची आवक वाढली

पश्चिम पट्टयात झालेल्या मुसळधार पावसामुळे भोजापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरू झाली आहे. ठाणगाव परिसरातील अनेक बंधाऱ्यांचे सांडवे वाहू लागल्याने हे पाणी म्हाळुंगी नदीपात्राने थेट भोजापूर धरणात येत आहे. गेल्या दोन दिवसांपासून धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत असल्याचे दिसून येते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT