नाशिक : राम काल पथ प्रकल्प बाधितांसाठी हिरावाडीतील ॲमेनिटी प्लॉटवर विशेष बांधकाम टीडीआरद्वारे उभारण्यात येणाऱ्या पुनर्वसन प्रकल्पास स्थानिक नागरिकांनी आक्षेप घेतला आहे. सुनावणी घेऊन सदर प्रकल्पास स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी हिरावाडीतील अर्पण विहारमधील रहिवाशांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. मागणी मान्य न झाल्यास उपोषण करण्याचा इशारा रहिवाशांनी दिला आहे.
पंचवटी व रामकुंड परिसरात महत्वाकांक्षी 'राम काल पथ'
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या निधीतून पंचवटी व रामकुंड परिसरात महत्वाकांक्षी 'राम काल पथ' उभारण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील कामांना महापालिकेने प्रशासकीय मंजुरी दिली असून पहिल्या टप्प्यातील कामांना सुरूवात देखील झाली आहे. या प्रकल्पात पंचवटीतील गावठाण भागातील अनेक जुने वाडे, घरे, दुकाने बाधित होत आहेत. या बाधितांपैकी सुमारे ६० कुटुंबांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासाठी हिरावाडीतील अर्पण विहार भागातील अॅमेनिटी प्लॉटवर विशेष बांधकाम टीडीआरच्या माध्यमातून या पुनर्वसन प्रकल्पाची उभारणी केली जाणार आहे. यासाठी बांधकाम व्यावसायिक अभय जैन यांच्यासमवेत पुनर्वसन कराराला महापालिकेच्या महासभा व स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.
दरम्यान, यासंदर्भातील माहिती अर्पण विहारातील स्थानिक रहिवाशांना समजल्यानंतर त्यांनी बाधितांच्या पुनर्वसन प्रकल्पास तीव्र आक्षेप घेतला असून हा निर्णय रद्द करण्याची मागणी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. यासंदर्भातील हरकत अर्ज विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकाऱ्यांना देखील सादर करण्यात आला आहे.
स्थानिकांचे म्हणणे असे ...
अर्पण विहार भागातील स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, बांधकाम व्यावसायिक अभय जैन यांनी फ्लॅट विकताना सदर अॅमेनिटी प्लॉट हा अर्पण विहारचा असून त्यावर पार्क किंवा मंदिर बांधून मिळेल, असे सांगून लोकांची दिशाभूल करून फ्लॅट विकले आहेत. अर्पण विहार रहिवाशी हे त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास आमरण उपोषणास बसणार आहे.