Simhastha provides employment to more than 15,000 locals
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आगामी सिंहस्थ कुंभमेळा नाशिक व त्र्यंबकेश्वरच्या विकासाची पर्वणी तर ठरणार आहेच पण, त्याचबरोबर या कुंभमेळ्याच्या माध्यमातून स्थानिकांनादेखील रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. कुंभमेळ्यात तब्बल पंधरा हजारांहून अधिक स्थानिकांना थेट रोजगार निर्माण होण्याचा प्रशासनाचा अंदाज आहे. विशेष म्हणजे या रोजगार निर्मितीसाठी स्थानिकांना रोजगार आणि कौशल्य प्रशिक्षणही दिले जाणार आहे.
नाशिकमध्ये २०२६-२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. या सिंहस्थासाठी जोरदार प्रशासकीय तयारी सुरू आहे. यंदाचा कुंभमेळा २१ महिने अर्थात ऑक्टोबर २०२६ ते जुलै २०२८ या कालावधीत संपन्न होणार आहे. सिंहस्थात सुमारे पाच लाख साधू-महंत व तब्बल दहा कोटी भाविक येण्याचा अंदाज आहे. या साधू-महंत व भाविकांना विविध सेवासुविधा पुरविण्यासाठी प्रशासनातर्फे नियोजन केले जात आहे.
नाशिक शहर व जिल्ह्याच्या शाश्वत विकासाच्या दृष्टिकोनातून हा कुंभमेळा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. यंदाचा कुंभमेळा केवळ देवदर्शन नव्हे, तर स्थानिक अर्थव्यवस्थेचे शक्तिशाली इंजिन ठरणार आहे. एका पर्यटकाच्या भेटीतून शहरातील ४५ पेक्षा अधिक घटक जसे की ऑटोचालक, हॉटेल, रेस्टॉरंट, गाइड, फुलवाले, हस्तकला विक्रेते, फोटोग्राफर आणि टॅक्सी सेवा थेट लाभ होतात. म्हणूनच यंदाच्या सिंहस्थात नाशिकला येणारे भाविक, पर्यटक केवळ 'येऊन जाऊ नये' तर इथे थांबावा, सुखद अनुभव घ्यावा आणि त्यास पुन्हा यावेसे वाटावे, यासाठी सरकार आणि स्थानिक प्रशासनाने ठोस उपक्रम हाती घेतले आहेत.
चार थीम सर्किटमध्ये विभागणी
सिंहस्थाच्या माध्यमातून पर्यटनाला बहर यावा यासाठी नाशिकची चार थीम सर्किटमध्ये विभागणी करण्यात आली आहे. सुलभवाहतूक सेवा, हॉटेल्स, होम स्टे, स्थानिक खानपान, हस्तकला व विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून पर्यटकांना इज ऑफ एक्सपिरिअन्स मिळावा, असा प्रयत्न राहणार आहे.
टुरिझम स्कील हबच्या माध्यमातून प्रशिक्षण
नाशिक टुरिझम स्कील हबच्या माध्यमातून युवकांना गाइड, हॉटेल मॅनेजमेंट, भाषा, ड्रायव्हिंग आणि डिजिटल मार्केटिंगचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. महिला बचत गटांसाठी फूड स्टॉल आणि क्राफ्ट मार्केट उभारण्याची योजना आहे. या माध्यमातून पंधरा हजारांहून अधिक स्थानिकांना थेट रोजगार निर्माण होण्याचा अंदाज आहे.