नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तपोवनात साधुग्रामसाठी २६८ एकर जागा भाडेतत्वावर घेण्याच्या महापालिकेच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फुली मारली आहे. जागा भाडेतत्वावर घेण्याऐवजी कायमस्वरूपी संपादीत करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. त्यानुसार ५० टक्के रोख व ५० टक्के टीडीआर स्वरूपात मोबदला देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून ५० टक्के रोख स्वरूपातील मोबदल्याची रक्कम चार टप्प्यात अदा करण्याचा नवा प्रस्ताव महापालिकेकडून मुख्यमंत्री कार्यालयास सादर केला जाणार आहे.
नाशिकमध्ये येत्या २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. सिंहस्थाच्या निमित्ताने येणाऱ्या लाखो साधु-महंत व कोट्यवधी भाविकांना महापालिकेच्या माध्यमातून सोयी-सुविधा पुरविल्या जाणार आहेत. साधु-महंतांच्या आखाड्यांसाठी महापालिकेच्या माध्यमातून तपोवनात एक हजार एकर क्षेत्रावर साधुग्रामची उभारणी केली जाणार आहे. सद्यस्थितीत तपोवनातील ९३ एकर जागा महापालिकेच्या ताब्यात आहे. आरक्षित क्षेत्रापैकी २८३ एकर क्षेत्र संपादीत करणे शिल्लक आहे. यासाठी प्रशासनापुढे संबंधित जागा कायमस्वरूपी संपादित करणे किंवा तात्पुरत्या स्वरूपात भाडेतत्त्वावर अधिग्रहीत करणे असे दोन प्रस्ताव आहेत.
परंतु, महापालिकेकडे भूसंपादनासाठी निधी नसल्यामुळे जागा ताब्यात घेण्यासाठी पाच प्रकारचे फॉर्म्युले तयार करण्यात आले होते. यासंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयात बैठक झाल्यानंतर प्रधान सचिव अश्विनी भिडे यांनी पाच प्रस्तावांसोबतच नवीन पर्यायाची चाचपणी करण्याचे निर्देश दिले होते. सर्व जागा ताब्यात घेण्यासाठी चार हजार कोटी रुपयांचा निधी लागत असल्यामुळे महापालिकेच्या नगररचना विभागाने ५० टक्के रोख मोबदला आणि ५० टक्के टीडीआरचा प्रस्ताव दिला होता. तरीही दोन हजार कोटींची आवश्यकता आहे. त्यामुळे भूसंपादनाऐवजी जागा भाडेतत्वावर घेण्याबाबतची चाचपणी प्रशासनाने सुरू केली होती. परंतु, जागा कायमस्वरुपी संपादीत करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत. त्यानुसार प्रधान सचिव भिडे यांनी महापालिकेला प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
साधूग्रामसाठी २६८ एकर जागा कायमस्वरूपी संपादीत करावी अशी मुख्यमंत्री कार्यालयाची सूचना आहे. त्यानुसार ५० टक्के टीडीआर, ५० टक्के रोख स्वरूपात मोबदला अदा करण्याचा प्रस्ताव असून ५० टक्के रोख रक्कम चार टप्प्यात देण्याबाबतच्या फॉर्म्यूल्यावर काम केले जात आहे.मनीषा खत्री, आयुक्त, महापालिका.
चार वर्षांत मोबदल्याचे वाटप
साधुग्राम भूसंपादनासाठी महापालिकेने ५० टक्के रोख आणि ५० टक्के टीडीआर स्वरूपात मोबदला देण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. रोख मोबदला चार टप्प्यांत दिला जाणार असून, दरवर्षी भूसंपादनासाठी अंदाजपत्रकात राखीव ठेवलेल्या निधीचाही त्यासाठी वापर करण्याची तयारी महापालिकेने दर्शवली आहे. आता या प्रस्तावावर मुख्यमंत्री कोणता निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे.