नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सिंहस्थ ध्वजारोहण सोहळा आणि कुंभमेळ्यासाठी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या भाविकांचा प्रवास सुकर करण्यासाठी प्रशासनाकडून तयारीला वेग आला असून वाहतूक नियोजन, पार्किंग स्थळे, दिशादर्शक फलक, साधुग्राममधील मूलभूत सुविधा आणि घाट विकासाच्या कामांचा शनिवारी (दि. १७) पालक सचिव तथा जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी आढावा घेतला.
तसेच विविध विभागांतील समन्वय वाढवून प्रलंबित मान्यता आणि तांत्रिक अडचणी वेळेत दूर करण्याचे निर्देश डवले यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले. नाशिक - त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या कार्यालयात पालक सचिव तथा जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
बैठकीस नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक संजय येनपुरे, कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, पोलिस अधीक्षक डी. एस. स्वामी यांच्यासह सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, वन, वीज पारेषण आणि राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रतिनिधींची उपस्थिती होती.
या बैठकीत नाशिक आणी त्र्यंबकेश्वरमधील प्रस्तावित पार्किंग स्थळे, वाहनक्षमता, प्रवेश व निर्गमन मार्ग आणि वाहतूक व्यवस्थापनाचा आढावा घेण्यात आला. भाविकांना सुविधांची ठिकाणे सहज शोधता यावीत, यासाठी दिशादर्शक फलकांची ठिकाणे, रचना आणि अंमलबजावणी याबाबत चर्चा करण्यात आली.
घाट विकाससह सुरक्षिततेवर लक्ष
घाटांच्या विकासाकामांबरोबर प्रवेशमार्ग, भाविकांची ये - जा, गर्दीचे व्यवस्थापन, सुरक्षितता आणि प्रकाशव्यवस्थायवर चर्चा झाली. घाटांवरील गर्दीच्या व्यवस्थापनाच्या प्रत्यक्ष व्यवस्थापनाच्या गरजा लक्षात घेऊन, पूरक नागरी सुविधांचे नियोजन करण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली.
साधुग्राममध्ये सुविधांची उभारणी
साधुग्रामचा नियोजित आराखडा, उपलब्ध जागा, अंतर्गत रस्ते आणि नागरी कामांचा आढावा घेण्यात आला. साधू-महंतांच्या निवाससाठी पाणीपुरवठा, स्वच्छता, वीजपुरवठा, प्रकाशव्यवस्था आणि अन्य मूलभूत सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने संबंधित विभागांनी समन्वयाने कामे पूर्ण करावीत, असे निर्देश देण्यात आले.
होणारी भाविकांची आणि वाहनांची वर्दळ लक्षात घेऊन वाहतूक नियोजन करण्यावर भर देण्यात आला. विविध विभागांची कामांची सद्यःस्थिती, काम पूर्ण होण्याचा कालावधी आणि वेळापत्रकाची अद्यावत माहिती ठेवावी. विभागांमध्ये समन्वयाअभावी निर्णय रखडणार नाहीत, यासाठी आवश्यक पाठपुरावा करावा, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या.