नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क | नाशिक येथील पुण्यनगरीत 2026-2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिककरिता 27 एमएलडी (मेगालिटर) आणि त्र्यंबकसाठी आठ एमएलडी पाणी देण्याची मागणी महापालिकेच्या वतीने राज्य सरकारकडे करण्यात आली आहे. याकरीता नगरोत्थान विभागाकडे तसा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.
मंगळवारी (दि.1) जिल्हाधिकारी कार्यालयात विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या उपस्थितीत कुंभमेळा नियोजन बैठक पार पडली. सिंहस्थ कुंभमेळ्यात शाहीस्नानासोबतच अन्य प्रमुख पर्वणींसाठी मोठ्या संख्येने दूरदूरवरुन भाविक नाशिकच्या पुण्यनगरीत येणार आहेत. या काळात भाविकांची वाढती संख्या तसेच नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील लोकसंख्या लक्षात घेता पिण्यासाठी तसेच वापरण्यासाठी पाणीप्रश्न निर्माण होऊ शकतो. त्या अनुषंगाने नाशिकसाठी 27 एमएलडी जादा पाण्याची आवश्यकता भासणार आहे.
मुकणे धरणातून पाणी आणून विल्होळी येथे मुबलक पाण्याचा संचय करण्याचे योजिले आहे. त्यासाठी तब्बल 400 कोटी खर्च अपेक्षित आहे. त्यासंदर्भात महापालिकेच्या वतीने नगरोत्थान विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. त्र्यंबक याठिकाणी देखील पाण्याचा प्रश्न भेडसावणार नाही यासाठी नगरपालिकेच्या वतीने आठ एमएलडी पाण्याची मागणी करण्यात आलेली आहे.
कुंभमेळा काळात भाविकांच्या सुरक्षेसाठी सद्यस्थितीत कार्यान्वित नसलेले स्मार्ट सिटीच्या वतीने 200 आणि 1100 महाआयटीच्या वतीने सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. तांत्रिक अडचणी पार पडल्यानंतर हे सीसीटीव्ही कॅमेरे लवकरच कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यासह वेगवेगळ्या मुद्यांवर कुंभमेळा नियोजन बैठकीत चर्चा करण्यात आली आहे.