शिर्डी विमानतळ Pudhari News Network
नाशिक

Simhastha Kumbh Mela Nashik: शिर्डी विमानतळावर दोन हेलिपॅड, आठ वाहनतळांना मान्यता

कुंभमेळा पार्श्वभूमीवर मान्यता; मुख्यमंत्र्यांकडून विस्तारीकरण कामाचा आढावा

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : आगामी नाशिक- त्र्यंबकेश्वर कुंभमेळा पार्श्वभूमीवर शिर्डी विमानतळ येथे दोन हेलिपॅड व आठ वाहनतळ उभारण्यास तसेच विमानतळाचे विस्तारीकरण, अद्ययावतीकरणास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विमानतळ प्राधिकरणाच्या बैठकीत मान्यता दिली आहे.

महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाच्या संचालक मंडळाची 91 वी बैठक सह्याद्री अतिथीगृहातील सभागृहात झाली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. प्राधिकरणाच्या उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालिका स्वाती पांडे यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

शिर्डी येथील विमान कार्गो टर्मिनलचे काम वेगाने सुरू आहे. नाशिकपासून शिर्डी विमानतळ जवळ असल्याने नाशिक- त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या वेळेस हवाई मार्गाने येणाऱ्या भाविकांना शिर्डी विमानतळ सोयीचे होणार आहे. त्यावेळी होणाऱ्या संभाव्य गर्दीचा विचार करून व नाशिक येथील विमानतळाची क्षमता लक्षात घेता शिर्डी विमानतळ विस्तारीकरणाच्या प्रस्तावास यावेळी मान्यता देण्यात आली. यामध्ये आठ वाहनतळे, दोन हेलिपॅड यासह टर्मिनलच्या अद्ययावतीकरणाचा समावेश आहे. याचा फायदा कुंभमेळ्यादरम्यान येणाऱ्या विमाने व हेलिकॉप्टर सेवेसाठी होणार आहे. याबरोबरच अमरावती येथे उद्योगाचे जाळे मोठ्या प्रमाणात विस्तारत असल्याने या ठिकाणची धावपट्टी वाढविणे आवश्यक आहे. तसेच या विमानतळापासून महसूल मिळविण्यासाठीचा आराखडा तयार करावा. मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केले. लातूर जिल्ह्याचा सर्व क्षेत्रात मोठ्या प्रमाणात विकास व विस्तार होत आहे. त्यामुळे लातूर विमानतळ महत्त्वाचे ठरणार आहे. या प्रसंगी संचालक मंडळातील सदस्य तथा वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलरासू यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

धुळे विमानतळ कामाचाही घेतला आढावा

बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी धुळे येथील विमानतळासह रत्नागिरी, अकोला, कोल्हापूर, नांदेड येथील कामाचाही आढावा घेतला. प्रादेशिक जोडणी योजना (रिजनल कनेक्टिव्हिटी स्किम) अंतर्गत सध्या राज्यात 16 मार्गांवर विमानसेवा सुरू असून, उडान योजनेंतर्गत राज्यातील आठ प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात आले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT