नाशिक : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर 'संकट हीच संधी' मानत पंचवटीतील काळाराम मंदिर ते सरदार चौक मार्गातील 'राम काल पथ' प्रकल्पबाधित सहा वाडे उतरविण्याची तयारी महापालिकेने केली आहे.
'राम काल पथ' प्रकल्पात बाधित होणारी अनेक बांधकामे, जुने वाडे नगररचना विभागाचा अभिप्राय न घेताच हटविण्याची तयारी प्रशासनाने केली होती. मात्र, यावरून कायदेशीर पेच निर्माण होण्याची शक्यता लक्षात आल्यानंतर आता नगररचना विभागाकडून अभिप्राय घेतला जाणार आहे.
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पर्यटन विभागाच्या निधीतून पंचवटीतील काळाराम मंदिर परिसर ते गोदाघाट या दरम्यान १४६ कोटींचा 'राम काल पथ' प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी ९९.१४ कोटींच्या खर्चास केंद्र सरकारने मंजुरी दिली असून, उर्वरित ४७ कोटींचा निधी राज्य शासनाकडून उपलब्ध करून दिला जाणार आहे. या प्रकल्पासाठी काळाराम मंदिरापासून गोदाघाटापर्यंतच्या मार्गाचे रुंदीकरण व सुशोभीकरण केले जाणार आहे. या रुंदीकरणात अनेक जुने वाडे, घरे बाधित होत आहेत. हे वाडे धोकादायक बनले आहेत. त्यामुळे या धोकादायक वाड्यांतील रहिवाशांचे महापालिकेच्या घरकुल योजनेत स्थलांतर करून मालकांना भूसंपादनाचा मोबदला देण्याची तयारी महापालिकेने केली आहे. मात्र, अनेक वाड्यांचा वाद न्यायालयात वर्षानुवर्षांपासून प्रलंबित असल्यामुळे मालकी हक्क सिद्ध करण्यामध्ये अडचणी येणार आहेत. त्यामुळे पहिला टप्प्यामध्ये पावसाळ्याच्या निमित्ताने जे जे धोकादायक वाडे यापूर्वी जाहीर केले आहे, त्यांना उतरवण्याची तयारी महापालिकेने केली आहे. त्यामुळे काळाराम मंदिर ते सरदार चौक यादरम्यान सहा वाड्यांना धोकादायक ठरवून हटवण्यासाठी नोटिसा काढण्यात आल्या आहेत.
भोलादास चाळ, तुळशीदास धर्मशाळा, एन. व्ही. पटेल किराणा दुकान वाडा, इनामदार वाडा, केळकर वाडा व मोरे वाडा पडिक भाग.