Simhastha Kumbh Mela Nashik Pudhari News Network
नाशिक

Simhastha Kumbh Mela Nashik: सिंहस्थ पाणीपुरवठा, मलनिस्सारण योजना 'फास्टट्रॅक'वर

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून सुटीच्या दिवशी प्रस्तावांची छाननी

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ३६७ कोटींची पाणीपुरवठा योजना तसेच नवीन मलवाहिका टाकण्याच्या २४० कोटींच्या दोन प्रस्तावांच्या मंजुरीची प्रक्रिया राज्य शासनाने फास्टट्रॅकवर घेतली आहे. सदर प्रस्ताव तातडीने तपासून शासनाच्या मंजुरीसाठी सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने शनिवारी (दि.७) सुटीच्या दिवशी प्रस्तावांची छाननी सुरू केली असून रविवारी (दि.८) ही प्रक्रिया पूर्ण करून शासनाच्या अंतिम मान्यतेसाठी प्रस्ताव सादर केला जाणार आहे.

शहराला प्रामुख्याने गंगापूर धरण व काही प्रमाणात मुकणे व अल्पप्रमाणात दारणा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जलसंपदा विभागाकडून महापालिकेला पाणी आरक्षण मंजूर केले जाते. यंदा महापालिकेने गंगापूर धरणातून ४५०० दशलक्ष घनफूट, दारणा धरणातून २०० तर मुकणे धरणातून १५०० दशलक्ष घनफूट पाण्याचे आरक्षण नोंदविले आहे. त्यानुसार दररोज २०.२० दशलक्ष घनफूट पाण्याचा उपसा तिन्ही धरणातून केला जातो. नाशिकमध्ये येत्या २०२६-२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार असून तिनही पर्वणीच्या दिवशी एक कोटी भाविक शहरात दाखल होतील तर वर्षभर जवळपास पाच कोटी भाविक शहरात येतील, असा अंदाज आहे. या भाविकांच्या पिण्याच्या पाण्याची तहान भागविण्यासाठी तसेच गोदावरीत वर्षभर कमी-अधिक प्रमाणात वाहते पाणी ठेवण्यासाठी विशेष पाण्याची तरतूद करावी लागणार आहे. गंगापूर धरणाची पाणी साठवण क्षमता व आरक्षित पाण्याचा विचार करता मुकणे धरणातून उपलब्ध होणाऱ्या पाण्यावर लक्ष केंद्रीत केले जात असून त्या अनुशंगाने पाणीपुरवठा योजनेचा ४०२ कोटींचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. त्यात यांत्रिकी विभागांच्या सूचनेनुसार बदल करून योजनेचा खर्च ४२६ कोटींपर्यंत नेण्यात आला होता. नंतर त्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने सुचविलेल्या सुधारणांनुसार पुन्हा बदल करण्यात आला असून आता हा आराखडा ३६७ कोटींवर स्थिरावला आहे. योजनेचा सुधारीत प्रस्ताव महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाला सादर करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे अमृत २ योजनेअंतर्गत मलवाहिका टाकण्याचे २४० कोटींचे दोन प्रस्तावही प्राधिकरणाकडे तपासणीसाठी सादर करण्यात आले आहेत.

शासनाकडून मिळणार 50 टक्के अनुदान

पाणीपुरवठा योजनेअंतर्गत मुकणे धरण पंपीग स्टेशन क्षमतावाढ, विल्होळी येथे २७४ दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेचे जलशुध्दीकरण केंद्र उभारणी तसेच या जलशुध्दीकरण केंद्रातून साधुग्रामपर्यंत मुख्य गुरूत्ववाहिनी अर्थात थेट जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. एकूण ३६७ कोटींच्या या योजनेसाठी शासनाच्या नगरोत्थान अभियानातून ५० टक्के निधी अनुदान स्वरूपात महापालिकेला मिळणार असून उर्वरित ५० टक्के खर्चाची जबाबदारी महापालिकेला उचलावी लागणार आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्यात भाविकांची गर्दी लक्षात घेवून पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी मजिप्राने सूचविलेल्या सुधारणांनुसार योजनेतील त्रुटी दूर करत सुधारीत प्रस्ताव मजिप्राला फेरमान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे मलवाहिकांच्या २४० कोटींच्या दोन प्रस्तावांचीही छाननी केली जात आहे.
रवींद्र धारणकर, अधीक्षक अभियंता, पाणीपुरवठा विभाग.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT