नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तसेच भविष्यातील नाशिक शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता नाशिकच्या रिंगरोडला मान्यता देण्यात आली आहे. रिंगरोडबाबत असलेल्या कामांना गती द्यावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्या. तर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर रस्त्याचे काम वर्षभरात पूर्ण केले जाणार असून, त्यालादेखील केंद्रीय मंत्री गडकरी यांनी तत्काळ मान्यता दिली आहे.
नाशिक येथे २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला जोडणाऱ्या रस्त्यांचे आधुनिकीकरण करण्याच्या नियमनासाठी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत नागपूर येथे रविवारी (दि. 22) बैठक झाली. बैठकीस कुंभमेळामंत्री गिरीश महाजन, मंत्री शिवेंद्रराजे भोसले, आमदार प्रा. देवयानी फरांदे, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महापालिका आयुक्त मनीषा खत्री तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे केंद्रीय तसेच राज्यस्तरावरील अधिकारी, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ, महाराष्ट्र पायाभूत विकास महामंडळ व सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत आगामी सिंहस्थाच्या तयारीसाठी नाशिकला लागून असलेल्या महामार्गांच्या पायाभूत सुविधांच्या विकासाची तातडीने गरज लक्षात घेता नाशिकला प्रमुख शहरे आणि शहरांना जोडणाऱ्या महामार्गांच्या विकास आणि सुधारणांना प्राधान्य देण्याबाबत आणि ती जलद करण्याबाबत चर्चा झाली. यात विद्यमान रस्त्यांचे रुंदीकरण, नवीन बायपास बांधणे आणि पर्यटकांच्या अपेक्षित गर्दीला सामावून घेण्यासाठी प्रगत वाहतूक व्यवस्थापन प्रणाली लागू करणे या बाबींचा समावेश आहे.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींना नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने रोड नेटवर्क तयार करायचे आहे. त्यामध्ये राष्ट्रीय महामार्ग असतील किंवा इतर महत्त्वाचे मार्ग असतील याकरिता केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा, अशा आशयाचे पत्र लिहिले होते. त्या दृष्टीने केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या समवेत बैठक झाली. बैठकीत नाशिकला जोडणारे छत्रपती संभाजीनगर, नागपूर, धुळे, मुंबई, गुजरात, पालघर यासह इतर प्रमुख आठ रस्ते आहेत. ज्याचा उपयोग सिंहस्थाच्या काळात वाहतुकीसाठी होणार आहे. तसेच काही अंतर्गत रस्ते जे राष्ट्रीय महामार्गाकडे आहे त्या रस्त्यांच्या विकासासंदर्भात केंद्रीय मंत्री गडकरी यांच्यासोबत चर्चा झाली. मंत्री गडकरी यांनी जवळपास सर्वच रस्त्यांना मान्यता दिली आहे.
यंदा कुंभमेळ्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग रस्त्यांची कामे होणार आहेत. घोटी-त्र्यंबकेश्वर-जव्हार हा रस्ता मुंबईत येणार आहे. त्यामुळे ही वाहतूक घोटीच्या माध्यमातून त्र्यंबकेश्वरपर्यंत पोहोचेल. यासाठी ३७०० कोटी रुपये खर्चून चारपदरी रस्ता करण्यात येणार आहे. तसेच नाशिक-सिन्नर रस्त्याचादेखील विस्तार केला जाणार आहे. याशिवाय नाशिककडे येणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाची सोय होणार असल्याने त्याचाही विस्तार केला जाणार आहे.गिरीश महाजन, कुंभमेळामंत्री
नाशिक-पेठ रस्ता चौपदरीकरण करण्यासाठी मान्यता.
वणी ते पिंपळगाव व नाशिक ते सिन्नर या रस्त्यांचादेखील विस्तारीकरणात समावेश.
सिन्नर ते नांदूरशिंगोटे व कोल्हारपर्यंत रस्तादेखील विस्तारित होणार.
नाशिक येथील द्वारका सर्कल, ओझर विमानतळाजवळील दहावा मैल जवळचे रस्ता क्रॉसिंग.