नाशिक : सिंहस्थाची कामे लाँग टर्म, मीड टर्म, शॉट टर्म या तीन फेजमध्ये करावी लागणार आहेत, त्यासाठी राज्याच्या बजेटमध्ये निधीची तरतूद करण्यात येईल. बैठकीत सिंहस्थाच्या कामांचे प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्याच्या सूचना अधिकार्यांना देण्यात आल्या आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा झाली असून 18 व 19 फेब्रुवारीला अधिकारी प्रयागराजचा दौरा करतील अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेचे आभार मानण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात आभार दौरा आयोजित केला आहे. या दौर्याच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारी (दि.14) नाशिकमध्ये आले असता त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात सिंहस्थ कामांसंदर्भात एमएनआरडीए, महापालिका, मेट्रो, सार्व. बांधकाम विभाग आदींची संयुक्त बैठक घेतली यावेळी सिंहस्थाशी संबंधित सर्व अधिकारी उपस्थित होते.
बैठकीनंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी शिंदे म्हणाले, लाँग टर्म कामे ज्यांना दोन ते अडीच वर्षे लागतील जसे की एसटीपी, रस्ते, ड्रेनेज सिस्टीम, वाहनतळ, साधुग्राम या विषयांना चालना देण्यात आली आहे. याचबरोबर वाहनतळ, स्वच्छता, रोड, पादचारी मार्ग जवळच्या महापालिकांकडून मनुष्यबळ, मशीनरी, टॉयलेट ब्लॉक उपलब्ध करुन घेणे, गर्दीचे नियोजन, आरोग्य यंत्रणेची उभारणी, गोदावरी नदीचे दुषित पाणी एसटीपीआयने ड्रेनेजच्या सिस्टीमद्वारे शुध्द करणे, फंड, पायाभुत सुविधा उपलब्ध करुन देणे आदी कामे युध्दपातळीवर सुरु आहेत. याचबरोबर रिक्त पदे, आणि बिंदु नामावली या विषयांवर चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. त्र्यंबकमध्ये आव्हानात्मक कामे असून गर्दीवर नियंत्रण राखण्यासाठी पोलीसांना शहर आणि ग्रामीणचे संयुक्त पथक बनविण्यासाठी सुचना दिल्याचे त्यांनी सांगितले.
आभार दौर्याच्या पार्श्वभुमीवर उबाठा गटातील अनेक नेते शिंदेसेनेत प्रवेश करण्याची शक्यता असल्याने यासंदर्भात 'ऑपरेशन टायगर' बाबत चर्चांना ऊत आला आहे. याबाबत उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, ऑपरेशन टायगर दोन अडीच वर्षापुर्वीच पार पडले. छोटी छोटी ऑपरेशन्स ही होतच राहतात असे सांगितले. यामुळे ऑपरेशन टायगरला एकप्रकारे पुष्टीच दिल्याचे बोलले जात आले.