नाशिकरोड : सिंहस्थ कुंभमेळा पार्श्वभूमीवर नाशिकरोड येथील रेल्वे मालधक्का चार महिन्यांसाठी बंद ठेवण्यात येतो. त्यामुळे सुमारे दोन हजारहून अधिक माथाडी कामगारांवर उपासमारीची वेळ येण्याची भीती व्यक्त होत आहे. या गंभीर प्रश्नावर रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख तथा माथाडी कामगार नेते रामबाबा पठारे यांनी रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सतीश कुमार यांच्याशी चर्चा केली. यावेळी सिंहस्थ काळात माथाडी कामगारांना पर्यायी रोजगार उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.
रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सतीश कुमार हे नुकतेच सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर नाशिकरोड रेल्वेस्थानकाच्या पाहणीसाठी आले होते. यात्रेकरूंना अधिक चांगल्या सुविधा देण्याच्या उद्देशाने त्यांच्या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले. मात्र, या दौऱ्यात माथाडी कामगारांच्या समस्याही ऐरणीवर आल्या.
माथाडी कामगार नेते रामबाबा पठारे यांनी सतीश कुमार यांना सविस्तर माहिती देताना सांगितले की, मागील सिंहस्थ काळातही मालधक्का बंद झाल्यामुळे कामगारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता. यंदाही तेच चित्र दिसून येत असून, कामगारांवर उपासमारीची वेळ येऊ शकते. त्यामुळे मालधक्का बंद असताना या कामगारांना पर्यायी रोजगार उपलब्ध करून द्यावा. याप्रसंगी प्रभाकर रोकडे, सुभाष अहिरे, कैलास भालेराव, सागर शार्दुल, सम्राट गायकवाड, जयराम जाधव आदी कामगार नेते उपस्थित होते.
सिंहस्थ कुंभमेळा धार्मिक व सांस्कृतिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा असला, तरी त्या अनुषंगाने घेतले जाणारे निर्णय स्थानिक कामगारांच्या जीवनावरही गंभीर परिणाम करतात, याचे भान रेल्वे प्रशासनाने ठेवावे, अशी भावना कामगार संघटनांनी व्यक्त केली आहे.