नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या माध्यमातून हाती घेण्यात येणाऱ्या पाणीपुरवठा विषयक कामांना देखील प्राधान्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार तीन टप्प्यात या कामांचे नियोजन करण्यात आले असून पहिल्या टप्प्यात सुमारे ८०० कोटींची कामे हाती घेतली जाणार असल्याचे वृत्त आहे.
नाशिकमध्ये २०२७ मध्ये होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यात सुमारे पाच लाख साधु-महंत व दहा कोटी भाविक येण्याचा अंदाज आहे. या साधु-महंत व भाविकांना पायाभूत सुविधा पुरविण्याची जबाबदारी नाशिक महापालिकेवर आहे. त्यादृष्टीने महापालिकेतर्फे नियोजन करण्यात आले आहे. या भाविकांसह शहरातील नागरिकांना पाणीपुरवठ्यासाठी गंगापूर धरणातून थेट पाणीपुरवठा करण्यासाठी सिमेंटच्या जलवाहिन्यांच्या जागी लोखंडी पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मुकणे धरण थेट पाणी पुरवठा योजनेचे विस्तारीकरण करण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत विल्होळी येथे २७४ दशलक्ष लिटर प्रति दिवस क्षमतेचे जलशुध्दीकरण केंद्र उभारण्यात येत आहे. त्यासाठी २५ किमीच्या गुरूत्ववाहिन्या टाकल्या जाणार आहेत. या कामासाठी सुमारे ४७० कोटी रूपयांचा खर्च लागणार असून, या कामाला मनपाच्या पाणी पुरवठा विभागाकडून सुरूवात करण्यात आली आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आता अवघे दीड ते दोन वर्षांचा कालावधी शिल्लक आहे. त्यादृष्टीने पाणीपुरवठाविषयक कामांचा प्राधान्यक्रम ठरविण्यात आला आहे. तिन्ही टप्प्यांतील कामांसाठी १२५० कोटींचा खर्च येणार आहे.
सिंहस्थ पाणीपुरवठ्यासाठी ही कामे होणार
पहिल्या टप्प्यात मुकणे धरण थेट पाणी पुरवठा योजनेचे विस्तारीकरण करणे व पंचवटी साधुग्रामपर्यंत मुख्य गुरुत्ववाहिनी टाकणे या कामांसाठी ४७० कोटी, साधुग्राम येथे दोन दशलक्ष लिटर क्षमतेचे दोन जलकुंभ उभारणे- पाच कोटी, साधुग्राम, वाहनतळ व भाविक मार्ग येथे ४८ किमीच्या जलवाहिन्या टाकणे- २५० कोटी, साधुग्राम सेक्टरमध्ये अंतर्गत ३६ किमीची पाणी पुरवठा व्यवस्था करणे- २५ कोटी, गंगापूर धरण येथे वाढीव क्षमतेचे पंपींग मशिनरी बसविणे व विद्युत विषयक कामे- २० कोटी, मुकणे धरणे येथे वाढीव क्षमतेचे पंपींग मशिनरी बसविणे- २० कोटी, पंचवटी, बाराबंगला, शिवाजीनगर जलशुध्दीकरण केंद्र येथे पंपींग मशिनरी व विद्युतविषयक कामे- ८.५० कोटी, मनपाच्या जलशुध्दीकरण केंद्रांसाठी पाणी शुध्दीकरणासाठी केमिकल्स व साहित्य पुरवठा- १.५० कोटी. यातील बहुतांश कामे ही मनपा प्रशासनाने सोयीनुसार दुसऱ्या टप्प्यातही धरली आहेत. तिसऱ्या टप्प्यात दारणा धरण येथून पाणी पुरवठा योजना राबवून पंचवटी साधुग्रामपर्यंत गुरूत्ववाहिनी टाकणे, गंगापूर धरण येथे नव्याने जॅकवेल बांधणे व नव्याने प्रस्तावित जॅकवेलसाठी पंपींग मशिनरी व अनुषंगीक कामांचा समावेश तिसऱ्या टप्प्यात करण्यात आला आहे.