नाशिक रोड : विभागीय आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना नीलम गोर्‍हे. समवेत विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा आदी. Pudhari News Network
नाशिक

Simhastha Kumbh Mela Nashik : कुंभमेळा मानदंड ठरेल, असे नियोजन करा

विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या सूचना

पुढारी वृत्तसेवा

नाशिक रोड : नाशिक- त्र्यंबकेश्वर येथे होणारा सिंहस्थ कुंभमेळा महिला, बालके, ज्येष्ठ नागरिक यांची सुरक्षितता आणि त्यांना पुरविण्यात येणाऱ्या सोयी सुविधांसाठी मानदंड म्हणून ओळखला जाईल, अशा पद्धतीने नियोजन करा. गर्दीचे व्यवस्थापन आणि पायाभूत सुविधा निर्माण करताना या बाबींकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना राज्याच्या विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या.

विभागीय आयुक्त कार्यालयात डॉ. गोऱ्हे यांनी कुंभमेळ्यादरम्यान महिला व बालकांची सुरक्षितता, स्वच्छता आणि इतर अनुषंगिक विषयांबाबत आढावा बैठक घेतली. त्यावेळी त्या बोलत होत्या. आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, मनपा उपायुक्त करिष्मा नायर, पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव, अपर पोलिस अधीक्षक आदित्य मिरखेलकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, कुंभमेळ्याच्या अनुषंगाने सर्वसमावेशक आराखडा तयार करताना या ठिकाणी येणाऱ्या महिला, बालके, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आदींना सेवा पुरविण्याबाबत प्राधान्याने विचार व्हायला हवा. कोट्यवधींच्या संख्येने भाविक जेव्हा कुंभमेळ्यासाठी येतील तेव्हा त्यांच्यासाठी ज्या पायाभूत सुविधा अपेक्षित आहेत. तसेच नदीप्रदूषण हा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे गोदावरी स्वच्छता मोहीम अधिक वेग घेईल, यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. तसेच जलप्रदूषण करणाऱ्या घटकांना प्रतिबंध केला पाहिजे, असे त्या म्हणाल्या. प्रयागराज येथील कुंभमेळा व्यवस्थापनाबद्दल अधिक चर्चा झाली. त्याच पद्धतीने नाशिक-त्र्यंबकेश्वर येथील कुंभमेळा व्हावा, अशी अपेक्षा डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केली. यावेळी विविध यंत्रणेने केलेल्या नियोजन आणि कार्यवाहीची माहिती देण्यात आली.

आसपासच्या पर्यटनाला चालना द्या

सायबर सुरक्षितता महत्त्वाचा घटक आहे. त्यादृष्टीने सुरक्षाविषयक उपाययोजना आवश्यक आहेत. केवळ नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच नव्हे तर आसपासच्या पर्यटनालाही कुंभमेळ्यामुळे चालना मिळणार आहे. त्यामुळे शिर्डी, शनिशिंगणापूर, सप्तश्रृंगीगड, घृष्णेश्वर, भीमाशंकर आदी ठिकाणी जाणारी दळणवळण व्यवस्था अधिक चांगली होईल, याकडे लक्ष द्यावे, अशी सूचन डॉ. गोऱ्हे यांनी केली.

मंदिरांची माहिती एकत्रित व्हावी

नाशिक शहरात गोदावरी नदीकाठी आणि शहरातही विविध मंदिरे आहेत. महापालिकेने याबाबत सर्वेक्षण करून या मंदिरांची एकत्रित माहिती तयार करावी. त्या मंदिरांकडे जाणारे मार्ग व्यवस्थित करावेत. यामुळे शहरातील धार्मिक पर्यटनालाही बळ मिळेल, असे उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT