नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तपोवनात उभारण्यात येणाऱ्या साधूग्रामसाठी आरक्षित जमिनीचे कायस्वरुपी भूसंपादन करण्यास शेतकरी आणि जागा मालकांनी विरोध दर्शवला आहे. आमच्या जमिनीवर आधीच आरक्षण असून त्यांचा ट्रस्ट आणि धार्मिक कार्यासाठी वापर केला जात आहे. त्यामुळे या जागा कायमस्वरुपी अधिग्रहीत करण्याऐवजी भाडेतत्वावर घ्या, अशी भूमिका शेतकरी व जागा मालकांनी घेतली आहे. दरम्यान, भूसंपादनासंदर्भात शेतकऱ्यांसोबत प्राथमिक चर्चा सुरू आहे. टप्प्याटप्प्याने सर्व शेतकरी आणि जागा मालकांसोबत चर्चा केली जाणार असून शेतकरी हिताचा प्रस्ताव महापालिकेकडून दिला जाईल, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
सिंहस्थासाठी तपोवनात १२०० एकर जागेवर साधुग्रामची उभारणी केली जाणार आहे. त्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली आहे. आरक्षित जागेपैकी महापालिकेने यापूर्वीने ९३ एकर जागा आधी अधिग्रहीत केली आहे. उर्वरित २८३ एकर जागा घेणे बाकी आहे. सध्या प्रशासनापुढे संबंधित जागा कायमस्वरुपी अधिग्रहीत करणे किंवा तात्पुरत्या स्वरुपात भाडेतत्त्वावर जमीन अधिग्रहण करणे असे दोनच प्रस्ताव आहेत. या जागेचे कायमस्वरुपी अधिग्रहणासाठी चार हजार कोटींची आवश्यकता आहे.
त्यामुळे महापालिकेकडे भूसंपादनासाठी एवढे पैसे नसल्यामुळे जागा ताब्यात घेण्यासाठी पाच प्रकारचे फॉर्मुले तयार केले होते. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाडेतत्वाऐवजी कायमस्वरुपी जागा भूसंपादित करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार उर्वरित जागा कायमस्वरुपी अधिग्रहण करण्यासाठी महापालिकेने १९० शेतकरी आणि जागा मालकांसोबत थेट वाटाघाटी सुरू केली आहे. गुरुवारी (दि.२०) नगररचना उपसंचालक दीपक वराडे आणि प्रशासन उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर यांनी पहिल्या टप्प्यात चर्चेसाठी १३ शेतकरी आणि जागा मालकांना आमंत्रित केले होते. त्यापैकी आठ जागा मालकांनी वाटाघाटीत सहभाग घेत जागा कायमस्वरुपी अधिग्रहण करण्यास नकार दर्शवला. त्याऐवजी भाडेपट्ट्यावर जागा घ्या, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
१९० शेतकरी, जागा मालकांशी चर्चा
आरक्षित जागेपैकी २६८ जागा १९० शेतकऱ्यांच्या ताब्यात आहे. या सर्वांसोबत महापालिका आता टप्प्याटप्प्याने अधिग्रहणासाठी चर्चा करणार आहे. गुरुवारी यातील १३ जागामालकांना वाटाघाटीसाठी आमंत्रित केले होते. उर्वरीत शेतकऱ्यांशीही चर्चा केली जाणार आहे. सद्य:स्थितीत ९४.०७ एकर महापालिकेने ताब्यात घेतली असून २८३ एकर क्षेत्र संपादन बाकी आहे. सध्या १३ एकर क्षेत्रात जनार्दन स्वामी मठ व लक्ष्मीनारायण मंदिराची लक्ष्मी गोशाळा आहे. १.५ एकर क्षेत्रात अभिन्यास मंजूर आहे.