नाशिक : जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात सिंहस्थ बैठकीचा आढावा घेताना मंत्री छगन भुजबळ. समवेत जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार. (छाया : हेमंत घोरपडे)
नाशिक

Simhastha Kumbh Mela Nashik : वेळेत पूर्ण होणारीच कामे हाती घ्या

सिंहस्थ आढावा बैठकीत मंत्री भुजबळ यांचे अधिकार्‍यांना आदेश

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : सिंहस्थाची वेळेत पूर्ण होणारीच कामे हाती घ्या, जी कामे वेळेत पूर्ण होतील ती पावसाळ्यानंतर लगेचच सुरू करा म्हणजे ती फेब्रुवारी मार्चपर्यंत पूर्ण होतील. द्वारका तसेच नाशिक शहर, मुंबई महामार्गावरील अंडरपासची कामे सिंहस्थापूर्वी पूर्ण होणे शक्य नसल्याने ती करू नका मात्र अंडरपासचे जे रस्ते खराब झाले असतील ते दूरुस्त करा. नाशिक-त्र्यंबक रस्त्याचे सहापदरीकरण लवकर पूर्ण करून वारकर्‍यांसाठी वेगळा रस्ता तसेच सायकलट्रॅक तयार करा, साधुग्राम भुसंपादनाबाबत योग्य तो तोडगा काढा, गोदावरीत शहरातील सांडपाणी मिळसणार नाही याचे नियोजन करून त्याची अंमलबजावणी करा, अशा सूचना मंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत. मंत्री भुजबळ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी (दि. 21) सिंहस्थ कुंभमेळ्याचा आढावा घेण्यासाठी संबंधित यंत्रणांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी मार्गदर्शन केले.

भुजबळ म्हणाले, पुढील 11 वर्षे टिकतील अशी कामे करणे गरजेचे आहे. साधुग्राम भुंसपादनासाठी नागरिकांचे प्रस्ताव आलेले असून त्यांच्या प्रस्तावांचा अभ्यास करून निर्णय घ्या. याशिवाय कुंभमेळ्यात वेगवेगळी प्रदर्शन केंद्रे स्थापन करता येतील याचीही व्यवस्था करा, कुंभमेळ्यादरम्यान गोदावरीचे शुद्धीकरण अत्यंत महत्वाचे असून गोदावरीत सांडपाणी, मलमूत्र मिसळणार नाही यासाठी वेगळी गटार तयार करा. शहराबाहेर प्रक्रिया केंद्राची स्थापना करुन प्रक्रिया केलेले पाणी वेगळ्या लाईनने सोडा. ठेकेदार केवळ पैसे घेतात पण प्रक्रिया केंद्रे पूर्ण क्षमतेने काम करीत नाही यासंदर्भात मी विधानसभेतही विषय मांडला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

बैठकीस जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, महानगरपालिकेच्या अतिरक्त आयुक्त स्मिता झगडे, प्रदीप चौधरी, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी दीपक पाटील, एमआयडीसीचे अधीक्षक अभियंता जयवंत पवार, निमाचे अध्यक्ष आशिष नहार, आयमाचे अध्यक्ष ललित बूब, मनीष रावल, योगिता आहेर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

इनर आऊटर रिंगरोडची देखभाल दुरुस्ती करा

सिंहस्थ बैठकांमध्ये नाशिक इनर आणि आऊटर रिंगरोडबाबत चर्चा ऐकण्यात येत असून हे रिंगरोड अगोदरच तयार आहेत, मात्र त्यांची देखभाल आणि दुरुस्ती होणे गरजेचे आहे. आऊटर रिंगरोडला जोडण्यात येणार्‍या मिसींग लिंकचे रस्ते तयार करण्याच्या सूचनाही यावेळी भुजबळांनी केल्या

साधुग्रामसाठी जमीन विकत घ्या

साधुग्रामसाठी जमिन भाड्याने घ्यायची की विकत घ्यायची याबाबत शासनस्तरावर चर्चा सुरू आहे. मात्र जेवढ्या पैशात जमीन भाड्याने घ्यायची आहे तेवढ्याच पैशात जमीन विकत घेता येत असेल तर विकतच घ्या, अशी सूचनाही मंत्री भुजबळ यांनी दिली.

भुजबळांनी अधिकार्‍यांना दिलेल्या सूचना

  • शहराबाहेर प्रक्रिया केंद्राची स्थापना करा.

  • नाशिकमधील वाहतुककोंडी सोडवा.

  • वाहतुककोंडी सोडविण्यासाठी पोलीसांसोबत वॉर्डनची नेमणूक करा.

  • पोलिस, वॉर्डनला विशेष पोलिस प्रशिक्षण द्या.

  • ओझर विमानतळांस अधिक सोईसुविधा उपलब्ध करून द्या.

  • गोदावरी काठावरील घाटांचे रुंदीकरण करणे आवश्यक

  • अंबड एमआयडीसीतील रस्त्याचे काँक्रिटीकरण करा

काही लोकांना वाद वाढविण्यात इंटरेस्ट : भुजबळ

मी सिंहस्थ बैठकीचा आढावा घेत आहे, कारण मंत्री म्हणून काम समजून घेण्याचा मला अधिकार आहे. माहिती घेणे, मागदर्शन करणे हा माझा अधिकार आहे. मात्र काही लोकांना वाद वाढ वाढविण्यात इंटरेस्ट आहे असा टोला अन्न व नागरी पुरवठामंत्री भुजबळ यांनी काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांना लगावला आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही भुजबळांचे समर्थन करीत भुजबळांनी बैठक घेतली तर तुम्हाला काय त्रास होतो असा सवाल केला आहे.

भुजबळांबाबत भाष्य करतांना नाना पटोले यांनी, सरकारमध्ये सर्व गोंधळ आहे. सिंहस्थ कुंभमेळा नाशिकमध्ये होत असताना श्रेयवादाची लढाई पहिल्या दिवसांपासून सुरू आहे. भुजबळ तर नंतर मंत्री झाले. भुजबळ तेल लावलेले पैलवान आहेत. ते काय करतील हे नंतर समजेल. गिरीश महाजन भुजबळ यांच्यासमोर बच्चे आहे अशी टीका नाना पटोलेंनी केली होती. यावर प्रतिक्रिया देतांना मंत्री भुजबळ म्हणाले, काही लोकांना उगाचच वाद वाढविण्यात इंटरेस्ट आहे, मात्र, मी मंत्री असल्याने मला सिंहस्थ कामांचा, जिल्ह्याच्या विकासकामांचा आढावा घेण्याचा अधिकार आहे. मागील कुंभमेळ्यात वेगवेगळी कामे केली, फ्लायओव्हर केले. यामुळे मला कामाचा अनुभव आहे. अनुभवाची शिदोरी जवळ असल्याने मी बैठक घेतली. मागील सिहस्थांमध्ये काय कामे केली याची माहिती मी अधिकार्‍यांना दिली, याशिवाय अधिकार्‍यांना अभ्यास करण्याच्या सूचनाही मी दिल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT