नाशिक : येत्या २०२७ मध्ये नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थांसाठी प्रयागराजच्या धर्तीवर स्वतंत्र सिंहस्थ प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली असून या प्राधिकरणाची सूत्रे विभागीय महसूल आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांच्याकडे देताना कुंभमेळा आयुक्त हे स्वतंत्र पद निर्माण करण्यात आले आहे. कुंभमेळा आयुक्तपदी नाशिक महापालिकेच्या अतिरीक्त आयुक्त करिष्मा नायर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याची जोरदार तयारी प्रशासकीय पातळीवर सुरू आहे. सिंहस्थासाठी महापालिकेने १५ हजार कोटी तर अन्य विभागांनी नऊ हजार कोटी अशा एकूण २४ हजार कोटींचा सिंहस्थ आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्याला अद्याप शासनाची मंजुरी मिळाली नसली तरी मंजुरीच्या अधिन राहून दोन हजार कोटींच्या सिंहस्थ कामांच्या निविदा कार्यवाहीत आणण्यात आल्या आहेत. सिंहस्थ कामांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रयागराजच्या धर्तीवर विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र सिंहस्थ प्राधिकरण स्थापन केले आहे. आता सिंहस्थ कामांसाठी विविध विभागांमध्ये समन्वय राखण्यासाठी मेळा आयुक्त म्हणून नायर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
विभागीय आयुक्त (अध्यक्ष), जिल्हाधिकारी, विशेष पोलिस महानिरीक्षक (उपाध्यक्ष), अहिल्यानगर जिल्हाधिकारी, नाशिक महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण आयुक्त, (पदसिध्द सदस्य) नाशिक शहर' पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षक नाशिक ग्रामीण, नाशिक महापालिका आयुक्त, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्याधिकारी त्र्यंबकेश्वर नगरपरिषद, नियोजन उपायुक्त, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ विभागीय नियंत्रक, आरोग्य उपसंचालक, अधीक्षक अभियंता जलसंपदा गोदावरी नदी व जलव्यवस्थापन, बांधकाम विभाग मुख्य अभियंता, मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, अधीक्षक अभियंता महावितरण, प्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ, सहसंचालक लेखा व कोषागरे, सहसंचालक नगररचना, रेल्वे मंडळाचा सदस्य आणि कुंभमेळा आयुक्त अशा २२ जणांचा समावेश आहे.