नाशिक : सिंहस्थ कुंभमेळा आणि वाद हे समीकरण यंदाही कायम राहण्याची शक्यता आहे. कुंभमेळ्याच्या आयोजनावरून पुन्हा एकदा जुना वाद उफाळला आहे. त्र्यंबकेश्वरच्या साधू-महंतांनी रविवारी (दि.23) रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत 'नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा'असा प्रचार न करता 'त्र्यंबकेश्वर-नाशिक कुंभमेळा' असा प्रचार करण्याची मागणी केल्यानंतर नाशिकच्या साधू-महंतांनी त्यास आक्षेप घेतला आहे.
'नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा' असे नामाभिधान योग्यच असल्याचा साधू-महंतांनी दावा केला आहे. दरम्यान, कुंभमेळ्याच्या नामकरणावरून सुरू झालेल्या या वादावर शासन दरबारीच निर्णय होईल, असे सांगत जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी मात्र कानावर हात ठेवले आहेत.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी रविवारी (दि. २३) सकाळी त्र्यंबकेश्वर येथे भेट दिली होती. त्र्यंबकेश्वर मंदिरात जाऊन संकल्प पूजा, अभिषेक केल्यानंतर फडणवीस यांनी साधू-महंतांशी सिंहस्थाबाबत चर्चा केली. साधू-महंतांचे म्हणणे जाणून घेतले. यावेळी त्र्यंबकेश्वर हेच सिंहस्थाचे मुख्य स्थान असल्याने कुंभमेळ्याचा उल्लेख करताना 'त्र्यंबकेश्वर- नाशिक' असा करावा, अशी मागणी त्र्यंबकेश्वरच्या साधू-महंतांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यांनंतर सोमवारी (दि.२४) जिल्हाधिकारी जलज शर्मा, महापालिका आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांच्या उपस्थितीत महापालिका मुख्यालयात साधू- महंतांची बैठक पार पडली. या बैठकीत नाशिकच्या साधु- महंतांनी त्र्यंबकेश्वरच्या साधु- महंतांच्या मागणीला तीव्र आक्षेप घेतला. नाशिकच्या साधू- महंतांनी यावर आक्षेप घेतला. साधु- महंतांचे प्रवक्ते महंत भक्तिचरणदास यांनी बैठकीत साधु- महंतांच्या मागण्या मांडताना 'नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा' असेच नामाभिधान योग्य असून तशी जुनी नोंद देखील असल्याचा दावा केला. त्र्यंबकेश्वर हे नाशिक जिल्ह्याचाच भाग आहे. त्यामुळे कुंभमेळ्याच्या नावावरून कुठलाही वाद केला जाऊ नये, असे आवाहन देखील महंत भक्तिचरणदास यांनी केले.
महंत सुधीरदास पुजारी म्हणाले की, व्याकरण दृष्ट्या नाशिक- त्र्यंबकेश्वर हेच नाव योग्य आहे. या आधीही नाशिक- त्र्यंबकेश्वर असाच उल्लेख केला जात होता. आता पुन्हा असा वाद नको. त्र्यंबकेश्वरमधून अशी मागणी करणे योग्य नाही. दोन्ही ठिकाणचे स्थान महात्म्य आहे, पण असा वाद नको. नाशिकमध्ये ही साधूंचे आखाडे आहेत. इथेही कुंभमेळा काळात स्नान होते. पेशवेकालीन निवाडा झाला असताना आता पुन्हा वाद उकरून काढू नये, असे महंत सुधीरदास पुजारी यांनी सांगितले.
या वादाबाबत माध्यम प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना विचारणा केली असता नामकरणाबाबतचा वादाबाबत स्थानिक पातळीवर निर्णय होणे शक्य नाही. त्र्यंबकेश्वर आणि नाशिकच्या साधु- महंताचे म्हणणे ऐकून जुन्या प्रशासकीय नोंदी आणि जुन्या संदर्भांचा अभ्यास करून या वादाबाबत मुख्यमंत्र्यांच्या स्तरावरच निर्णय घेण्यात येईल, असे शर्मा यांनी स्पष्ट केले.