नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या स्वतंत्र प्राधिकरणासाठी शासनाने अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या ७६ पदनिर्मितीच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. यामध्ये ५२ नियमित व २४ पदे बाह्ययंत्रणेद्वारे भरली जाणार आहेत. याशिवाय मंत्रालय स्तरावर देखील स्वतंत्र कुंभमेळा कक्ष असणार आहे. यामुळे सिंहस्थ कामांना आता खऱ्या अर्थाने चालना मिळणार आहे.
नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे येत्या २०२६-२७मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. यासाठी शासनाने कायदा करत स्वतंत्र कुंभमेळा प्राधिकरणाची स्थापना केली आहे. या प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांची तर कुंभमेळा आयुक्तपदी शेखर सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महापालिका तसेच संबंधित शासकीय विभागांतील अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सिंहस्थ कामांना सुरूवात केली गेली. परंतु प्राधिकरणाकडे कामकाजासाठी स्वतंत्र अधिकारी, कर्मचारी वर्ग नसल्यामुळे प्राधिकरण कायद्यातील तरतुदींनुसार अध्यक्ष डॉ. गेडाम यांनी पदनिर्मितीचा प्रस्ताव शासनाच्या मान्यतेसाठी सादर केला होता. सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन तसेच अंमलबजावणीचा कालावधी संपेपर्यंत नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण नाशिक अंतर्गत ५२ नियमित पदे निर्माण करण्यास तसेच २४ मनुष्यबळ सेवा बाह्ययंत्रणेद्वारे अशाप्रकारे ७६ पदांच्या निर्मितीला शासनाने मंजुरी दिली आहे.
अशी होणार नियुक्ती
सदर पदे प्रतिनियुक्ती, निवृत्त अधिकारी, कर्मचाऱ्यांमधून किंवा इतर मार्गाने आणि कंत्राटी पदे थेट जाहिरातीद्वारे किंवा मनुष्यबळ पुरवठा करणाऱ्या यंत्रणेमार्फत नियुक्त केली जाणार आहेत. नियमित पदांच्या भरतीसाठी प्राधिकरणामार्फत शासनाच्या नगरविकास विभागाकडे प्रस्ताव पाठवावा लागणार आहे.
मंत्रालयातही कुंभमेळा कक्ष
नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थासाठी मंत्रालयातही स्वतंत्र कुंभमेळा कक्ष स्थापन केला जाणार आहे. या कक्षासाठी अवर सचिव - १, कक्ष अधिकारी- १, सहाय्यक कक्ष अधिकारी- २, लिपिक टंकलेखक- २ पदे मंजूर करण्यात आली आहेत. यामुळे सिंहस्थ कामांना आता वेग येणार आहे.
नियमित पदे
१. कुंभमेळा आयुक्त कक्ष
कुंभमेळा आयुक्त(भाप्रसे)-१, लघुलेखक(उच्चश्रेणी)/ (निम्नश्रेणी)/ लघुटंकलेखक-१, लिपिक/वरिष्ठ लिपिक किंवा इतर विभागातील समकक्ष- ४.
२. सर्वसाधारण संनियंत्रण व धार्मिक बाबी
भाप्रसे किंवर अप्पर जिल्हाधिकारी किंवा सह आयुक्त, नगरविकास- २, मुख्याधिकारी(गट-अ) (निवडश्रेणी)/ मुख्याधिकारी(गट-अ)/ उपजिल्हाधिकारी किंवा इतर विभागातील समकक्ष-३, मुख्याधिकारी(गट-अ)/ तहसीलदार किंवा मुख्याधिकारी(गट-ब)/ नायब तहसीलदार किंवा समकक्ष- ४, मुख्याधिकारी(गट-ब)/ प्रशासन अधिकारी/ कार्यालयीन अधीक्षक-१, लघुलेखक(उच्चश्रेणी)/ लघुलेखक(निम्नश्रेणी), लघुटंकलेखक-३, सहा.महसुल अधिकारी/ महसुल सहाय्यक किंवा लिपिक-४.
३. गर्दी नियंत्रण, कायदा व सुव्यस्था
भापोसे किंवा अपर पोलीस अधीक्षक, पोलीस उपायुक्त- १, पोलीस निरीक्षक, सपोनी- २, वरिष्ठ लिपीक, लिपीक- २.
४. निधीचे सुयोग्य नियोजन व खर्च
उपायुक्त(नियोजन) किंवा जिल्हा नियोजन अधिकारी- १, मुख्य लेखा व वित्त अधिकारी- १, वरिष्ठ लेखाधिकी- १, उपलेखापाल- २, वरिष्ठ लिपिक, लिपिक- ३.
५. गुणवत्ता नियंत्रण
अधीक्षक अभियंता/ कार्यकारी अभियंता- १, कार्यकारी अभियंता/ उपअभियंता- २, उपअभियंता/ शाखा अभियंता- २, संशोधन अधिकारी- १, लिपिक/ वरिष्ठ लिपिक- ३.
६. सोशल मिडिया व पीआर टीम
जिल्हा माहिती अधिकारी किंवा माहिती अधिकारी- १
बाह्ययंत्रणेमार्फत पदभरती
सोशल मिडीया व पीआर टीम-८, सल्लागार व विषय तज्ज्ञ- ८, शिपाई- ८, भाडे तत्वावर वाहन चालकासह वाहन उपलब्धता- आवश्यकतेनुसार