नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकमध्ये येणाऱ्या साधू-महंत व भाविकांसाठी विविध सोयी-सुविधांच्या निर्मितीसाठी शेकडो कोटींच्या कामांसाठी निधीची जमवाजमव करताना दमछाक होत असलेल्या नाशिक महापालिकेसमोर शहरातील नागरिकांना पायाभूत सुविधा पुरवण्याचे मोठे आव्हान आगामी वर्षात असणार आहे. सिंहस्थासाठी कर्जाद्वारे निधी उभारताना सार्वत्रिक निवडणुकांच्या माध्यमातून साडेतीन वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर महापालिकेने येणाऱ्या लोकप्रतिनिधींचा निधीअभावी हिरमोड होणार नाही, याकडेही प्रशासनाला विशेष लक्ष द्यावे लागणार आहे.
७ नोव्हेंबर १९८२ ला नाशिकरोड - देवळाली व सातपूर नगरपालिका तसेच लगतच्या २२ खेड्यांचे विलीनीकरण करत अस्तित्वात आलेल्या नाशिक महापालिकेचा ४३ वा वर्धापन दिन शुक्रवारी (दि. ७) साजरा होत आहे. महापालिका स्थापनेनंतर ४३ वर्षांच्या वाटचालीत सुरुवातीची १० वर्षे प्रशासकीय राजवट होती. त्यानंतर २९ वर्षे लोकप्रतिनिधींच्या समन्वयाने शहराचा विकास झाला. महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुका लांबल्याने गेल्या साडेतीन वर्षांपासून महापालिकेत प्रशासकीय राजवट आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर निवडणुकांच्या उंबरठ्यावर असलेल्या नाशिक महापालिकेने ४३ वर्षांच्या इतिहासात मोठ्या प्रमाणावर नागरी विकासाची कामे करत महाराष्ट्रातील अग्रगण्य महापालिका म्हणून नावलौकिक मिळवला. मात्र, बदलत्या काळात शहराची वाढलेली लोकसंख्या, वाढता विस्तार लक्षात घेता पायाभूत सुविधांसाठी वाढलेला ताण आणि नोकरभरतीअभावी प्रशासकीय व्यवस्थेत आलेले शैथिल्य दूर करण्याचे आवाहन नाशिक महापालिकेसमोर उभे ठाकले आहे. महापालिकेचा १० वर्षांपूर्वीच ब वर्गीय महापालिकेत समावेश झाला असला तरी मंजूर आस्थापना परिशिष्ट क वर्गीय आहे. ब वर्गीय महापालिकेचा सुधारित आकृतिबंध आठ वर्षे शासन मान्यतेअभावी प्रलंबित आहे. त्यामुळे महापालिकेत गेली २४ वर्षे नोकरभरती झालेली नाही. उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा वाढलेला ताण महापालिकेच्या कामकाजावर परिणाम करणारा ठरत आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळा महापालिकेच्या कार्यक्षमतेची परीक्षा घेणारा ठरणार आहे. गेल्या साडेतीन वर्षांपासून सुरू असलेल्या प्रशासकीय राजवटीतील कारभार नाशिककरांना लोकप्रतिनिधींची पदोपदी आठवण करून देणारा आहे. आगामी निवडणुकीच्या माध्यमातून नव्या वर्षात महापालिकेला नवे लोकप्रतिनिधी मिळणार असले तरी सिंहस्थ कामांवर होणारा खर्च, त्यासाठी कर्ज, बॉण्डद्वारे निधीची जुळवाजुळव करताना महापालिकेच्या असलेल्या ठेवीही मोडीत काढल्या जात असल्याने नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींना आगामी वर्षात काम करण्यासाठी कितपत वाव असेल, हादेखील संशोधनाचा विषय ठरणार आहे.
महापालिकेसमोरील आव्हाने
सिंहस्थ कुंभमेळ्याचे यशस्वी आयोजन करणे, सिंहस्थ कामांसाठी निधीची उपलब्धता करणे, सिंहस्थ कामांची गुणवत्ता राखली जाणे, गोदावरी नदी प्रदूषणमुक्त करणे, मलनिस्सारण आणि जलव्यवस्थापन करणे, महापालिकेसाठी उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करणे, घरपट्टी, पाणीपट्टीची थकबाकी वसूल करणे, नागरिकांना विनाविलंब मूलभूत सेवासुविधा उपलब्ध करणे, मूलभूत सुविधांविषयक नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करणे, शहरातील रस्ते खड्डेमुक्त करणे, वाहतूक नियोजन करत पार्किंगची व्यवस्था करणे, शहरात सुरळीत व स्वच्छ पाणीपुरवठा करणे, शहर बससेवेत सुधारणा करणे, तोटा दूर करणे.