नाशिक : होऊ घातलेल्या सिंहस्थात भाविकांना सुरक्षा पुरवविण्यासाठी पोलिस दल कृत्रिम बुद्धीमत्तेचा अर्थात 'एआय'चा खुबीने वापर करणार आहे. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत मर्यादीत मनुष्यबळाचा प्रश्न सोडविण्यासाठी एआय तंत्रज्ञान उपयुक्त ठरणार असून, सिंहस्थात एआय पोलिसांचा तिसरा डोळा असेल, अशी माहिती राज्याचे अपर पोलिस महासंचालक निखील गुप्ता यांनी दिली.
आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्तालयात शनिवारी (दि.२१) विभागातील पोलिस अधिकाऱ्यांच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी बैठक घेण्यात आली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत, सिंहस्थातील पोलिसांच्या तयारीवर भाष्य केले. अपर पोलिस महासंचालक गुप्ता म्हणाले, 'सिंहस्थासाठी दीड ते पावणेदोन वर्षांचा कालावधी असून, या काळात पूर्वतयारी करणे शक्य आहे. प्रयागराजच्या धर्तीवर नाशिकच्या सिंहस्थात देखील कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून नवतंत्रज्ञानाचा अधिकाधिक उपयोग करण्यावर आमचा भर असणार आहे. त्याबाबतचे पूर्वनियोजन सध्या सुरू आहे. प्रत्येक सिंहस्थात पोलिस आयुक्तालयाच्या हद्दवाढीच मुद्दा कायम उपस्थित होतो. मात्र, स्थानिक अधिकाऱ्यांच्या अधिकारातील तो विषय आहे. त्यांच्याकडून या विषयाचा आग्रह होऊन प्रस्ताव आल्यास तसा विचार केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. गुप्ता यांनी सिंहस्थ तयारीचा आढावा घेताना, उपस्थित अधिकाऱ्यांना विशेष सूचना दिल्या.
पोलिस खात्याने ई-साक्ष नावाचे अॅप विकसित केले असून, पंच फितूरी रोखण्यासाठी त्याचा उपयोग होईल, असा विश्वास गुप्ता यांनी व्यक्त केला. घटनास्थळी घटनेचा पंचनामा करतानाच नोंदविली जाणारी साक्ष ही कॅमेऱ्यासमोर नोंदविली जाईल. 'ई साक्ष' अॅपवर तो व्हीडिओ अपलोड करून न्यायालयासमोर सादरीकरण करताना न्यायाधीश ती साक्ष बघू शकतील. त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या दबावाने पंच फितूर होणार नाहीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याशिवाय झिरो क्रमांकाने कुणीही कोणत्याही पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवू शकतो. यापुढे तेथे हद्दीचा मुद्दा येणार नाही. झिरो क्रमांकाने नोंदविलेला गुन्हा संबंधित पोलिस ठाण्यास ४८ तासात वर्ग केला जाईल.
सायबर गुन्ह्यांचे मोठे आव्हान असून, ते रोखण्यासाठी शाळा-महाविद्यालयांमध्ये जनजागृती केली जाणार आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागातही हा उपक्रम राबविला जाणार असून, त्यात ११२ क्रमाकांचे महत्त्वही समजावून सांगितले जाईल. नागरिकांशी संवाद साधताना, उपस्थित उद्योजकांनी सायबर गुन्ह्याचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर, त्यांनी याबाबतची माहिती दिली. समृद्धी महामार्गावर लूटमारीच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी उपाययोजना करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नागरिकांशी संवाद साधताना, उपस्थित उद्योजकांनी शहर तसेच ग्रामीण भागात पोलिस चौक्या उभारण्याची गरज आहे. तसेच ज्याठिकाणी पोलिस ठाणे गरजेचे आहे, तेथे चौक्यांचे रूंपातर ठाण्यामध्ये करण्याची मागणी केली. तसेच शहर पोलिसांची हद्द वाढविण्यात यावी, अशीही मागणी केली. निमा अध्यक्ष आशिष नहार, आयमा अध्यक्ष ललित बूब, माजी अध्यक्ष धनंजय बेळे, हर्षद बेळे, कैलास पाटील आदींनी प्रश्न उपस्थित केले. यावेळी उद्योजकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य द्यावे, अशा सूचना गुप्ता यांनी अधिकाऱ्यांना केल्या.