नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात २९ ऑन स्ट्रीट आणि सहा ऑफ स्ट्रीट अशा ३५ स्मार्ट पार्किंगस्थळांची उभारणी करण्यात येणार आहे. यासाठी निविदाप्रक्रिया राबविण्याची तयारी करण्यात आली असून यातून महापालिकेला महसूलही उपलब्ध होणार आहे. यासाठी पोलिसांबरोबर सामंजस्य करार केला जाणार आहे.
शहरातील रविवार कारंजा, पंचवटी, मेनरोड, सराफ बाजार, सीबीएस, कॉलेजरोड यांसारख्या व्यापारी भागात वाहनतळांची कमतरता गंभीर बनली आहे. त्यामुळे रस्त्यावर अयोग्यपणे उभी केली जाणारी वाहने वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरत आहेत. शहरभरातील ही समस्या दूर करण्याचे प्रयत्न अनेक वर्षांपासून सुरू असले तरी समाधान मिळालेले नाही.
आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्या कार्यकाळात स्मार्ट सिटी अंतर्गत २८ ऑन-स्ट्रीट व ५ ऑफ-स्ट्रीट पार्किंगसाठी मंजुरी मिळाली होती. त्यापैकी १५ ऑन-स्ट्रीट पार्किंग स्थळे विकसित झाली, मात्र कोरोनाकाळात सवलत न मिळाल्याने ठेकेदाराने संचलनात सहभाग घेतला नाही. त्यामुळे ही पार्किंग स्थळे वापरात येऊ शकली नाहीत. सध्या आयुक्त मनिषा खत्री यांनी या वाहनतळांच्या विकासासाठी पुढाकार घेतला आहे.
३५ पार्किंग स्थळे सुरू करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्याची तयारी सुरू केली आहे. यातून ठेकेदारासह पोलिस, महापालिकेला देखील आर्थिक उत्पन्न मिळणार आहे. यासाठी महापालिकेने पोलिस आयुक्तांना पत्र पाठविले असून पोलिसांकडून ना हरकत दाखला प्राप्त झाल्यानंतर पुढील प्रक्रिया राबविली जाणार आहे.
या पार्किंग स्थळांलगतच्या दोनशे ते पाचशे मीटरपर्यंतचा परिसर हा 'नो पार्किंग झोन' केला जाणार असून अनधिकृतरित्या पार्क केलेली वाहने पोलिसांच्या मदतीने ठेकेदारामार्फत टोईंग केली जातील. त्यासाठी आर्थिक दंड करण्याचे अधिकार महापालिकेकडून ठेकेदाराऐवजी पोलिसांना दिले जाणार आहेत. टोईंग व्हॅन सोबत पोलिस कर्मचारी राहणार असून वाहनचालकांकडून दंडही ऑनलाईन पद्धतीने वसूल केला जाईल. तसेच पोलिसांच्या आर्थिक दंडासोबतच महापालिका सुद्धा अतिरिक्त पाचशे रुपये दंड आकारणार आहे. त्यासाठी पोलिसांसोबत सामजंस्य करार केला जाणार आहे.
वाहतूक कोंडी फोडण्यासाठी शहरात ३५ पार्किंग स्थळांचा विकास केला जाणार आहे. पार्किंग स्थळापासूनचा काही परिसर हा नो पार्किंग झोन केला जाणार असून याबाबतच्या 'एनओसी'साठी पोलिस प्रशासनाला पत्र पाठविले आहे.रवींद्र बागूल, कार्यकारी अभियंता, वाहतूक सेल