नाशिक महापालिका आयुक्त मनिषा खत्री  Pudhari file photo
नाशिक

Simhastha Dhwajarohan | सिंहस्थ ध्वजारोहणाची दखल परदेशातही!

Simhastha Dhwajarohan | अमेरिकेच्या राजदूतांकडून महापालिका आयुक्तांचे अभिनंदन

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सिंहस्थ कुंभमेळ्याचे ऐतिहासिक ध्वजारोहण दि. ३१ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पार पडला. या सोहळ्याची दखल परदेशातही घेतली जात आहे. अमेरिकेच्या लक्झेंबर्गमधील राजदूत स्टेसी फेनबर्ग यांनी नाशिक महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांना थेट संदेश पाठवून सोहळ्याच्या यशस्वी आयोजनाबद्दल अभिनंदन केले आहे.

राष्ट्रपतींच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्यासाठी नाशिकमध्ये प्रशासनाकडून व्यापक नियोजन करण्यात आले होते. रामकुंड परिसरातील व्यवस्था, सुरक्षेचे नियोजन, वाहतूक नियंत्रण, स्वच्छता तसेच विविध शासकीय यंत्रणांमधील समन्वय अशा महत्त्वपूर्ण बाबींची जबाबदारी महापालिका प्रशासनाने सांभाळली.

हजारो नागरिकांच्या उपस्थितीत संपूर्ण कार्यक्रम सुरळीत पार पाडण्याचे आव्हान प्रशासनासमोर होते. आयुक्त खत्री यांच्या मार्गदर्शनाखाली या व्यवस्थांचे नियोजन करण्यात आले होते. सोहळा यशस्वी आयोजनाची दखल घेत स्टेसी फेनबर्ग यांनी आयुक्त खत्री यांना संदेश पाठवला.

'हाय मनिषा, ध्वजारोहण सोहळा यशस्वीपणे पार पडल्याबद्दल तुमचे अभिनंदन करायचे होते. पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा,' अशा शब्दांत त्यांनी कौतुक केले.
स्टेसी फेनबर्ग या अमेरिकेतील उद्योजिका आणि गुंतवणूकदार असून, नोव्हेंबर २०२५ पासून लक्झेंबर्गमधील अमेरिकेच्या राजदूत म्हणून कार्यरत आहेत.

त्यांच्या नियुक्तीला अमेरिकेच्या सिनेटने मंजुरी दिली होती. महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्याच्या क्षेत्रातही त्यांचे योगदान आहे. सिंहस्थ २०२७ च्या तयारीतील पहिल्याच मोठ्या सोहळ्याच्या आयोजनाला परदेशातून मिळालेली ही दाद महापालिका प्रशासनासाठी महत्त्वपूर्ण मानली जात आहे. त्यामुळे नाशिकच्या ऐतिहासिक सोहळ्याची चर्चा देशाच्या सीमां पलीकडे पोहोचल्याचे चित्र आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT