नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आता दोन वर्षांपेक्षा कमी कालावधी शिल्लक असताना शासनाकडून अद्याप निधी न मिळाल्याने महापालिकेने सिंहस्थांतर्गत रस्ते विकासासाठी नव्याने प्राधान्यक्रम निश्चित करत विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव पाठविला आहे. त्यानुसार 195 किलोमीटर लांबीच्या अंतर्गत, मध्य व बाह्य रिंग रोडच्या अस्तरीकरण, डांबरीकरणावर दोन हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
2027 मध्ये नाशिकमध्ये होणार्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी महापालिकेने 15 हजार कोटींचा आराखडा राज्य शासनाकडे सादर केला आहे. लाखो साधू-महंत व कोट्यवधी भाविकांसाठी आवश्यक सोयी-सुविधा पुरविण्याची महापालिकेची जबाबदारी आहे. मात्र आता दोन वर्षांपेक्षा कमी कालावधी उरला असतानाही शासनाकडून निधी जाहीर झालेला नाही.
पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीला 57 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मंजूर करताना सिंहस्थ कामांसाठी जेमतेम एक हजार कोटींची तरतूद मंजूर केली गेली. मात्र ही तरतूद महापालिकेमार्फत केल्या जाणार्या सिंहस्थ कामांसाठी, शासनाच्या अन्य विभागांमार्फत केल्या जाणार्या कामांसाठी की, सिंहस्थ प्राधिकरणासाठी हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. त्यामुळे सिंहस्थ कामांना अद्याप सुरुवात होऊ शकलेली नाही. आता शिल्लक कालावधी लक्षात घेता मोठे प्रकल्प हाती घेणे शक्य होणार नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता नव्याने प्राधान्यक्रम निश्चित करण्याची नामुष्की प्रशासनावर ओढावली आहे.
सुरुवातीला अडीच हजार कोटींच्या रस्त्यांची कामे सिंहस्थ आराखड्यात प्रस्तावित केली होती. आता त्यातील 500 कोटींच्या कामांवर फुली मारण्यात आली असून, नव्याने दोन हजार कोटींच्या सिंहस्थ रस्ते कामांचा अहवाल विभागीय आयुक्तांना सादर करण्यात आला आहे.
विजय-ममता चौक (पुणे रोड) ते टाकळी गाव-संगम पूल-मिरची हॉटेल-अमृतधाम-तारवालानगर चौक-शरदचंद्र पवार मार्केट यार्ड- मंडलिक मळा-ड्रीम कॅसल चौक-हनुमानवाडी- इंद्रप्रस्थ पूल-गंगापूर नाका-शरणपूर पोलिस चौकी (त्र्यंबक रोड)- मायको सर्कल-चांडक सर्कल-तूपसाखरे लॉन्स-मुंबई नाका-छान हॉटेल-भारतनगर झोपडपट्टी-अशोक मार्ग-विजय ममता चौक.
नव्याने प्राधान्यक्रम निश्चित करताना गत सिंहस्थात तयार करण्यात आलेल्या अंतर्गत, मध्य व बाह्य रिंग रोडचे डांबरीकरण, अस्तरीकरण व डागडुजी केली जाणार आहे. रिंग रोडच्या रुंदीकरणासाठी भूसंपादनाला अधिक वेळ जाणार असल्याने रुंदीकरण प्रस्तावित करण्यात आलेले नाही.
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आता कमी कालावधी राहिला आहे. प्रस्तावित कामे पावणेदोन वर्षात पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यामुळे रस्ते डांबरीकरण, अस्तरीकरणासाठी प्राधान्यक्रम निश्चित करण्यात आला आहे.संजय अग्रवाल, शहर अभियंता, महापालिका