Back Pain  
नाशिक

Simhastha Kumbh 2027 roadwork| 'कुंभ'च्या खोदकामाने नाशिककरांचा मोडला कणा !

चार हजारांपेक्षा अधिक नाशिककर पाठदुखी, मणक्याच्या त्रासाने ग्रस्त

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर शहरात सुरू असलेल्या विकासकामांचा फटका आता थेट नाशिककरांच्या आरोग्याला बसू लागला आहे. पाणीपुरवठा, मलनिस्सारण, रस्ते, ड्रेनेज, वीज, केबल यांसह विविध कामांसाठी शहरभर बेसुमार खोदकाम केले जात असून, पावसाळ्यात हे खोदकाम आता नाशिककरांच्या जीवावर उठत आहे. शहराच्या कानाकोपऱ्यातील रस्ते खड्डेमय व चिखलमय झाल्याने नाशिककरांचा दैनंदिन प्रवास अक्षरशः जीवघेणा ठरत आहे.

वाहनधारकांना सतत धक्के बसत असल्याने पाठीदुखी, मणक्याचे विकार, कंबरदुखी आणि मानदुखीच्या तक्रारींमध्ये मोठी वाढ झाली आहे. नाशिकमध्ये असा एकही प्रमुख व उपरस्ता शिल्लक राहिलेला नाही, जिथे खड्डे नाहीत. अनेक ठिकाणी खोदकामानंतर टाकलेला राडारोडा रस्त्यावर आल्याने, पावसामुळे तो चिखलात बदलला आहे. परिणामी दुचाकीस्वारांचे संतुलन बिघडून अपघात होत आहेत. चारचाकी वाहनांनाही मोठे धक्के बसत असल्याने, चारचाकीचा प्रवासही त्रासदायक होत आहे. विशेषतः दुचाकीवरून दररोज १५ ते ३०

किलोमीटर नागरिकांमध्ये मणक्यावरील ताण वाढल्याचे डॉक्टर सांगतात. खड्यांमुळे वाहनांना बसणारे सततचे धक्के कंबर, मान आणि मणक्याच्या डिस्कवर परिणाम करत आहेत. वृद्ध, महिला आणि आधीपासून मणक्याच्या त्रासाने ग्रस्त असलेल्या रुग्णांना हा त्रास प्रवास करणाऱ्या अधिक जाणवत आहे.

शहरातील अनेक ऑर्थोपेडिक व स्पाइन क्लिनिकमध्ये गेल्या काही दिवसांत पाठीदुखी, मणक्याचा त्रास, स्लिप डिस्क, सायटिका आणि मानदुखीच्या रुग्णांमध्ये सुमारे २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे निरीक्षण आहे.

मागील काही दिवसांपासून ओपीडीमध्ये पाठीदुखी, मणक्याचे विकार, कंबरदुखी आणि मानदुखीच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. याशिवाय खड्ड्यांमुळे वाहनांचे क्लज आणि ब्रेक वारंवार दाबावे लागत असल्याने, अँकल ज्वाइंटचा त्रास झालेले रुग्णही वाढले आहेत. नाशिककरांनी खबरदारी बाळगत प्रवास करावा, तसेच प्रशासनाने तत्काळ शहर खड्डेमुक्त करायला हवे.

- डॉ. भूषण देशमुख, रोबोटिक ज्वाइंट रिप्लेसमेंट सर्जन

अपघातामुळे गंभीर रुग्णांची संख्या वाढली

आरोग्याच्या समस्यांबरोबरच अपघातांची संख्याही वाढली आहे. आतापर्यंत खड्यांमुळे झालेल्या अपघातांत चौघांचा मृत्यू झाल्याची नोंद असून, अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. पावसाळ्यात खड्यांमध्ये पाणी साचल्याने त्यांची खोली लक्षात न आल्यामुळे अपघातांचा धोका अधिक वाढत आहे. विकासकामे आवश्यक असली, तरी त्याचे योग्य नियोजन, तात्पुरती दुरुस्ती आणि सुरक्षित वाहतुकीची व्यवस्था न केल्याने नागरिकांना मोठी किंमत मोजावी लागत असल्याची भावना व्यक्त होत आहे. कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांसाठी शहर सजविण्याच्या प्रयत्नात नाशिककरांचे दैनंदिन जीवन मात्र खड्ड्यांच्या खाईत घातल्याचे चित्र आहे.

खड्डेमय रस्त्यांवर वेग मर्यादित ठेवा दुचाकी चालविताना अचानक ब्रेक टाळा पाठीचा त्रास सुरू झाल्यास दुर्लक्ष करू नका सतत प्रवास करणाऱ्यांनी हलके व्यायाम करावेत हेल्मेटसह आवश्यक सुरक्षासाहित्याचा वापर करावा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT