नाशिक : गेल्या वर्षभरापासून चांदी दरवाढीने पकडलेला वेग नव्या वर्षातही कायम असून, १ ते १४ जानेवारीदरम्यान चांदीत तब्बल ४९ हजारांची वाढ नोंदविली गेली आहे. त्यामुळे चांदी लवकरच तीन लाखांचा टप्पा गाठेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, तीन दिवसांत चांदीत तब्बल २१ हजारांची वाढ नोंदविली गेल्याने, चांदीने सर्वकालीन उच्चांकी दर गाठला आहे.
गेल्यावर्षी चांदीने दरवाढीचे सर्व विक्रम मोडताना, चांदी नव्या वर्षात तीन ते साडे तीन लाखांचा टप्पा गाठेल असा अंदाज वर्तविला जात होता. मात्र, नव्या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात चांदी तीन लाखांच्या उंबरठ्यावर पोहोचल्याने, जाणकारांचे सर्व अंदाज फोल ठरताना दिसत आहेत. महिन्याच्या पहिल्या तारखेपासूनच चांदीने दरवाढीचा सुसाट वेग पकडलेला आहे.
१ जानेवारी २०२६ रोजी चांदी प्रति किलो जीएसटीसह २ लाख ३८ हजार ९६० रुपयांवर होती. १४ जानेवारी रोजी चांदी थेट प्रति किलो जीएसटीसह २ लाख ८७ हजार ८८० रुपयांवर पोहोचली आहे. अवघ्या १४ दिवसांतच चांदीत तब्बल ४८ हजार ९२० रुपयांची वाढ नोंदविली गेली आहे. चांदीतील ही वाढ आतापर्यंतची सर्वात विक्रमी ठरली असून, चांदी तीन लाखांपासून केवळ १२ हजार १२० रुपये दूर आहे.
चांदीत ज्या गतीने वाढ नोंदविली जात आहे, त्यावरून चांदी कुठल्याही क्षणी तीन लाखांच्या क्लबमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.दरम्यान, मागील तीन दिवसांत चांदीत तब्बल २१ हजार ६३० रुपयांची मोठी वाढ नोंदविली गेली आहे. सोमवारी (दि.१२) चांदीचा दर प्रति किलो जीएसटीसह २ लाख ६६ हजार २५० रुपये इतका होता. बुधवारी (दि.१४) प्रति किलो जीएसटीसह २ लाख ८७ हजार ८८० रुपये इतका नोंदविला गेला आहे.
सोने दरात देखील तेजी कायम आहे. सोने दीड लाखाच्या दरापासून अवघे तीन पावले दूर आहेत. बुधवारी (दि.१४) २४ कॅरेट सोने प्रति तोळा, जीएसटीसह १ लाख ४६ हजार ६७० रुपये इतका नोंदविला गेला. दीड लाखांपासून सोने आता केवळ ३ हजार ३३० रुपये दूर आहे. सोने दरवाढीचा विचार करता, पुढील काही दिवसात सोने दीड लाखांच्या क्लबमध्ये एंट्री करण्याची शक्यता आहे.
२४ कॅरेट - प्रति तोळा - १ लाख ४६ हजार ६७० रुपये
२२ कॅरेट - प्रति तोळा - १ लाख ३४ हजार ९४० रुपये
चांदी - प्रति किलो - २ लाख ८७ हजार ८८० रुपये
(सर्व दर जीएसटीसह)