जळगाव : संक्रांतीच्या मुहूर्तावर सोने खरेदीचे स्वप्न पाहणाऱ्या सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच कात्री लागली आहे. जळगावच्या सुवर्णनगरीत गेल्या चार दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात मोठा 'लपंडाव' सुरू असून, चांदीने तर आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढत थेट २ लाख ८५ हजारांचा टप्पा गाठला आहे. १३ जानेवारीला २ लाख ६६ हजारांवर असलेली चांदी १७ जानेवारीला २ लाख ८५ हजारांवर पोहोचल्याने ग्राहकांचे डोळे विस्फारले आहेत.
गेल्या आठवड्या भरापासून सराफा बाजारात दरांचे वारं चौफेर उधळले आहे. १३ जानेवारीला २४ कॅरेट सोन्याचा भाव १ लाख ४० हजार ५०० रुपये होता. तो मकर संक्रांतीच्या दिवशी (१४ जानेवारी) थेट १ लाख ४२ हजारांवर पोहोचला. त्यानंतर १५ तारखेला यात काहीशी घसरण होऊन तो १ लाख ४१ हजार २०० रुपयांवर आला. मात्र, हा दिलासा क्षणभंगुर ठरला असून आज (१७ जानेवारी) पुन्हा सोन्याने डोके वर काढत १ लाख ४१ हजार ६०० रुपयांची पातळी गाठली आहे.
सर्वात धक्कादायक वाढ चांदीच्या दरात पाहायला मिळत आहे. १३ जानेवारीला २ लाख ६६ हजार रुपये किलो असलेली चांदी आज १७ जानेवारीला थेट २ लाख ८५ हजार रुपयांवर पोहोचली आहे. अवघ्या चार दिवसांत किलोमागे तब्बल १९ हजार रुपयांची वाढ झाल्याने गुंतवणूकदारांची 'चांदी' झाली आहे, मात्र लग्नसराईसाठी खरेदी करणाऱ्या ग्राहकांचे बजेट कोलमडले आहे.
तारीख 22 कॅरेट सोने (प्रति १० ग्रॅम)
13 जानेवारी. 128700
14 जानेवारी. 130000
15 जानेवारी. 129340
17 जानेवारी. 129700
तारीख 24 कॅरेट सोने (प्रति १० ग्रॅम)
13 जानेवारी. 140500
14 जानेवारी. 142000
15 जानेवारी. 141200
17 जानेवारी. 141600
चांदी (प्रति किलो)
13 जानेवारी. 266000
14 जानेवारी. 282000
15 जानेवारी. 278000
17 जानेवारी. 285000
एकीकडे शेअर बाजारातील अस्थिरता आणि दुसरीकडे जागतिक घडामोडी यामुळे सोन्या-चांदीचे भाव रोज नवीन उच्चांक गाठत आहेत. सकाळी एक भाव आणि संध्याकाळी दुसराच भाव, अशी परिस्थिती असल्याने 'खरेदी करावी की थांबावे?' अशा संभ्रमात जळगावकर ग्राहक अडकला आहे. २२ कॅरेट दागिन्यांच्या सोन्याचा भावही आता १ लाख ३० हजारांच्या उंबरठ्यावर (१,२९,७००) असल्याने मध्यमवर्गीयांचे 'सोने' करण्याचे स्वप्न महाग झाले आहे.