चांदीचे दर दररोज मोठी झेप घेत असल्याने, नव्या वर्षात चांदी दोन लाखांचा स्तर गाठण्याचा अंदाज आहे.  Pudhari News Network
नाशिक

Silver Price Hike : चांदीत सरासरी तीन हजारांची दररोज वाढ

नव्या वर्षात करणार दोन लाखांचा टप्पा पार

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : दिवाळीनंतर सोने-चांदी दरवाढीला ब्रेक लागल्याने, ग्राहकांमध्ये काहीसे समाधानाचे वातावरण होते. मात्र, आता सोने-चांदीने दरवाढीचा सुसाट वेग पकडल्याने, ग्राहकांचे समाधान क्षणभंगूर ठरले. विशेषत: चांदीचे दर दररोज मोठी झेप घेत असल्याने, नव्या वर्षात चांदी दोन लाखांचा स्तर गाठण्याचा अंदाज आहे. मागील काही दिवसांचा विचार केल्यास, चांदीच्या दरात सरासरी दररोज तीन हजारांची वाढ होत आहे. सोबत सोने दरही सुसाट असल्याने, लवकरच दीड लाखांचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे.

अमेरिकेकडून अर्थ व उद्योग क्षेत्रात उचलली जाणारी पावले, जगातील युद्धजन्य स्थिती यामुळे जगभरात मौल्यवान धातुच्या किंमती सातत्याने उच्चांकी स्तर गाठत आहेत. विशेषत: चांदी दरात दररोज नवे उच्चांक नोंदविले जात असल्याने, चांदी आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात आहे. तर दुसरीकडे गुंतवणूकदार मात्र चांगलेच सक्रीय झाले आहेत. गेल्या दिवाळीला धनत्रयोदशीच्या (१८ आॅक्टोंबर २०२५) मुहूर्तावर चांदी जीएसटीसह प्रति किलो १ लाख ७४ हजार ५०० रुपये या दरावर होती. तर २४ कॅरेट सोने प्रति तोळा १ लाख ३१ हजार ६०० व २२ कॅरेट सोने प्रति तोळा १ लाख २१ हजार रुपयांवर होते. सोने-चांदीने हंगामातील सर्वकालीन उच्चांकी दर तेव्हा नोंदविला होता. त्यानंतर मात्र दरवाढीला काहीसा ब्रेक लागला. तसेच दर देखील काही प्रमाणात कमी झाले होते. नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात लग्नसराई असलेल्या यजमान मंडळींसाठी हा दिलासा ठरला.

मात्र, आता पुन्हा एकदा सोने-चांदी दरांनी वेग पकडला आहे. विशेषत: चांदी दर विक्रमी टप्प्यावर आहेत. मागील आठवडाभराचा विचार केल्यास, गेल्या २६ नोव्हेंबर रोजी चांदीचा दर प्रति किलो जीएसटीसह १ लाख ६५ हजार ८३० रुपये इतका होता. बुधवारी (दि.३) दर थेट १ लाख ८६ हजार ५०० रुपयांवर पोहोचला आहे. अवघ्या आठच दिवसात चांदी दरात तब्बल २० हजार ६७० रुपयांची वाढ नोंदविली गेली आहे. दिवसाची सरासरी काढल्यास, चांदीत जवळपास दररोज तीन हजार रुपयांची वाढ नोंदविली जात आहे. दरवाढीचा हा वेग कायम राहिल्यास, महिना अखेरपर्यंतच चांदी दोन लाखांचा टप्पा पार करण्याची शक्यता सराफ व्यावसायिकांकडून वर्तविली जात आहे.

सोनेही सुसाट

सोने दरांनी देखील चांगलाच वेग पकडला आहे. गेल्या २६ नोव्हेंबर रोजी २४ कॅरेट सोने प्रति तोळा जीएसटीसह १ लाख ३० हजार ४०० रुपयांवर होता. बुधवारी (दि.३) हा दर थेट १ लाख ३३ हजारांवर पोहोचला आहे. तर २२ कॅरेट सोने प्रति तोळा १ लाख १९ हजार ९७० रुपयांवरून थेट १ लाख २२ हजार ३६० रुपयांवर पोहाेचले आहे. सोने दरवाढीचा वेग लक्षात घेता, लवकर सोने दीड लाखांच्या क्लबमध्ये एंट्री करण्याची शक्या आहे.

Nashik Latest News

अमेरिकेतील महागाई, बेरोजगारी, चीनकडून सुरू असलेली चांदीची खरेदी, युद्धजन्य स्थिती या आंतरराष्ट्रीय कारणांमुळे सोने व चांदीचे दर येत्या काळात वाढतेच राहण्याची शक्यता आहे.
चेतन राजापूरकर, सराफ व्यावसायिक, नाशिक

बुधवारचे (दि.3 डिसेंबर 2025) दर असे...

  • २४ कॅरेट सोने- प्रति तोळा - १ लाख ३३ हजार

  • २२ कॅरेट सोने - प्रति तोळा - १ लाख २६ हजार ३६० रु.

  • चांदी - प्रति किलो १ लाख ८६ हजार ५०० रु.

  • (सर्व दर जीएसटीसह)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT