नाशिक : मागील काही दिवसांपासून सराफ बाजारात सोने-चांदी दरवाढीचा भूकंप होत असून, गुरुवारी (दि. 29) दरवाढीचा महाभूकंप झाल्याने चांदी एका दिवसात विक्रमी 44 हजारांनी वाढून थेट 4 लाख पार गेली आहे; तर सोनेही 14 हजारांनी वधारल्याने दोन लाखांच्या समीप पोहोचले आहे. सोने-चांदीतील ही दरवाढ थक्क करणारी असून, हा वेग कायम राहिल्यास पुढच्या काही दिवसांतच दोन्ही मौल्यवान धातू आणखी विक्रमाचे इमले चढण्याची शक्यता आहे.
जागतिक बाजारपेठेतील अनिश्चितता आणि भू-राजकीय तणावाचे पडसाद सोने-चांदी दरांवर दररोज उमटत आहेत. गुरुवारी दरांनी विक्रमी मजल मारल्याने, हे दोन्ही धातू सर्वकालीन उच्चांकावर पोहोचले आहेत. विशेषत: चांदीने प्रथमच एका दिवसात 43 हजार 780 रुपयांची विक्रमी वाढ नोंदविली आहे. बुधवारी चांदीचा दर प्रतिकिलो 3 लाख 80 हजार 580 रुपये इतका होता. गुरुवारी दर थेट 4 लाख 24 हजार 360 रुपयांवर पोहोचला. 1 ते 29 जानेवारीदरम्यान चांदीत तब्बल 1 लाख 85 हजार 400 रुपयांची वाढ नोंदविली गेली असून, ही वाढ 200 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. आतापर्यंत चांदीत एका दिवसात 24 हजारांची सर्वाधिक वाढ नोंदविली गेली होती. मात्र, गुरुवारी हा विक्रम मोडीत काढत एका दिवसात सुमारे 44 हजारांची वाढ नोंदविली गेल्याने, या वर्षअखेरीस चांदीचे दर कुठला टप्पा गाठतील, याचा अंदाज बांधणे अवघड झाले आहे.
दुसरीकडे, सोने दरवाढीनेदेखील वेग पकडल्यानेे, 24 कॅरेट सोने लवकरच दोन लाखांच्या क्लबमध्ये प्रवेश करण्याची चिन्हे आहेत. गुरुवारी सोने 14 हजारांनी वधारत 1 लाख 83 हजार 440 रुपयांवर पोहोचले आहे. बुधवारी 24 कॅरेट सोने, प्रतितोळा, जीएसटीसह 1 लाख 69 हजार 430 रुपयांवर होते. गुरुवारी हा दर थेट 1 लाख 83 हजार 440 रुपयांवर पोहोचला आहे. 1 जे 29 जानेवारीदरम्यान 24 कॅरेट सोन्यात 45 हजार 210 रुपयांची मोठी वाढ नोंदविली गेली आहे. तर, 22 कॅरेट सोन्यानेदेखील मोठी मजल मारत विक्रमी प्रतितोळा, जीएसटीसह 1 लाख 68 हजार 770 रुपयांपर्यंतचा स्तर गाठला आहे.
कोल्हापूर : कोल्हापूर सराफ बाजारात बुधवारपर्यंत 1.65 लाखांवर असलेले सोने गुरुवारी जीएसटीसह थेट 1 लाख 84 हजार रुपयांच्या शिखरावर पोहोचले. 24 तासांत सोन्याच्या दरात 19 हजार रुपयांची अभूतपूर्व वाढ झाली आहे. चांदीनेही गुरुवारी नवा इतिहास रचला. पाच दिवसांत 34 हजारांनी वाढलेली चांदी गुरुवारी एकाच दिवसात 40 हजार रुपयांनी वधारली असून, भाव आता 4 लाख 10 हजार रुपये प्रतिकिलो अशा पातळीवर गेला आहे.