नाशिक : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाने युथ फेस्टिवल मैदानावर आयोजित केलेल्या जागतिक कृषी महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी शेतकरी कुटुंबातील आठ मुला-मुलींचा सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात पार पडला. तसेच, 500 हून अधिक उपवर-वधूंनी विवाहासाठी नोंदणी केली. हा सोहळा मंदाकिनी मोरे आणि आबासाहेब मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
शेतीविषयी जागृती, शेतकऱ्यांना न्याय व योग्य मार्गदर्शन मिळावे, तसेच सेंद्रिय शेतीचा लाभ सर्वांना मिळावा, या उद्देशाने अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गतर्फे आयोजित जागतिक कृषी महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या महोत्सवाअंतर्गत विविध समाजोपयोगी उपक्रम राबवले जात असून, त्याचाच एक भाग म्हणून शेतकऱ्यांच्या मुला-मुलींचा सामूहिक विवाह सोहळा आयोजिला गेला. त्यामध्ये पंकज मुरमुरे - खुशी बावणे (शिर्डी), भूषण देवकर - वृषाली मवाळ (शिर्डी), आदित्य देशमुख -पल्लवी देवकर (अहिल्यानगर), सागर गावित - कल्याणी कोकणे (नंदुरबार ), धनंजय मैसाने - साक्षी गाडगे (अकोला), शुभम सारडा- सारिका बजाज (परभणी), रचित सहस्त्रबुद्धे - शुभांगी कारसर्पे (परभणी), प्रशांत अहिरे - दीपाली (नाशिक) यांनी लग्नगाठ बांधली. सेवामार्गातर्फे नवविवाहित दांपत्यांना कन्यादान स्वरूपात भांड्यांचा संच भेट म्हणून देण्यात आला. या उपक्रमांतर्गतच विवाह नोंदणीला शेतकऱ्यांच्या मुली मुलींचा चांगला प्रतिसाद मिळाला.