चांदवड(जि. नाशिक) : शारदीय नवरात्रोत्सवाला येत्या ३ आक्टोबरपासून प्रारंभ होत आहे. त्यानुसार साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धेपीठ असलेल्या श्री रेणुका माता मंदिर ट्रस्टने यात्रोत्सवाची जोरदार तयारी सुरू केली आहे. नवरात्रात राज्य व परराज्यातील लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असतात, भक्तांना सुलभ दर्शन व्हावे, यादृष्टीने चोख व्यवस्था केली जात असल्याची माहिती ट्रस्टचे व्यवस्थापक सुभाष पवार यांनी दिली.
चांदवड शहराच्या उत्तर बाजूला असलेल्या सातपुडा पवर्तरांगेतील डोंगराच्या खुशीत श्री रेणुका माता स्वयंभू विराजमान झाली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुढाकाराने या मंदिराचा जीर्णोद्धार होऊन मंदिर नावारूपाला आले. मुंबई-आग्रा महामार्गालगत हे ठिकाण असल्याने भाविकांना प्रवासासाठी अतिशय सोयीस्कर ठरते. दरम्यान, अतिशय छोट्या स्वरुपात असलेले श्री रेणुका मातेचे मंदिर गेल्या १५ वर्षांत झालेल्या विकासकामांमुळे प्रकाशझोतात आले आहे.
दरवर्षी नवरात्रोत्सवात मंदिर परिसरात यात्रा भरते. या काळात मंदिर ट्रस्टचे व्यवस्थापक एम. के. पवार, सुभाष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. पहाटे, दुपारी व रात्री अशा तीन वेळेस श्री रेणुकामातेची महाआरती होते. नवरात्रात मंदिरात नवचंडी उत्सव केला जातो. श्री रेणुका माता उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत असल्याने अनेक भाविक या ठिकाणी आपले नवस फेडण्यासाठी ही येत असतात.
भाविकांचे उन, वारा व पाऊस यापासून संरक्षण व्हावे, यासाठी ताडपत्रीचा मंडप देण्यात आला आहे. तसेच घटी बसणाऱ्या महिलांना अंघोळीसाठी गरम पाण्याचीही सुविधा केली जाणार आहे. दरम्यान, यात्रा काळात शिवसेना व भाऊसाहेब चौधरी फाऊंडेशनतर्फे साबुदाणा खिचडी, केळी, पिण्याचे पाणी मोफत वाटप होणार आहे. आरोग्य तपासणी शिबिरही होईल.
मंदिर परिसरातील भक्तनिवास, विश्रामगृह, प्रसाधनगृहाची डागडुजी व साफसफाईचे कामकाज सुरू आहे. दर्शनबारीसाठी स्टीलचे बॅरिकेडिंग, वाहनतळ, विद्युत रोषणाई अशी कामे होत आहेत. भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी वॉटरप्रूफिंग मंडप टाकण्यात येत असल्याचे मंदिराचे व्यवस्थापक सुभाष पवार यांनी सांगितले.