License Cancelled File Photo
नाशिक

Umrane Market License Cancelled |उमराणे येथील श्री रामेश्वर कृषी मार्केटचा परवाना रद्द

शेतकऱ्यांच्या हिताकडे दुर्लक्ष, नियमांचे उल्लंघन; पणन संचालक शरद जरे यांचे आदेश

पुढारी वृत्तसेवा

Rameshwar Krushi Market License Cancelled

देवळा : देवळा तालुक्यातील महात्मा फुलेनगर (उमराणे) येथील श्री रामेश्वर कृषी मार्केट या खाजगी कृषी बाजाराचा परवाना राज्याचे पणन संचालक शरद जरे यांनी रद्द केला आहे. ३० जुलै रोजी हा आदेश जारी करण्यात आला असून, या निर्णयामुळे संबंधित बाजारातील शेतमाल खरेदी-विक्रीचे व्यवहार तातडीने बंद होणार आहेत. या निर्णयाने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

मागील वर्षी जून २०२५ मध्ये पणन विभागाच्या सहसंचालक स्नेहा जोशी यांनी या खाजगी बाजाराची सविस्तर तपासणी केली होती. त्यावेळी बाजारातील व्यापाऱ्यांच्या व्यवहारांवर परवानाधारक संस्थेचे प्रभावी नियंत्रण नसल्याचे आढळून आले. तसेच शेतकऱ्यांनी विक्री केलेल्या मालाचे पैसे नियमानुसार वेळेत दिले जात आहेत की नाही, याबाबतही बाजार व्यवस्थापन अनभिज्ञ असल्याचे तपासणीत स्पष्ट झाले.

तपासणीदरम्यान काही व्यापाऱ्यांच्या शेतमाल खरेदी व शेतकऱ्यांना अदा केलेल्या रकमेची आवश्यक नोंद उपलब्ध नव्हती. याच काळात बाजारात हर्षद ट्रेडर्स विरोधात घोषणाबाजी झाल्यानंतर शेतकऱ्यांकडून तक्रारी मागविण्यात आल्या होत्या. त्यावेळी तब्बल ३८ अर्ज प्राप्त झाले होते. या तक्रारींमध्ये शेतकऱ्यांना नियमानुसार ठरलेल्या मुदतीत पैसे न मिळाल्याचा गंभीर मुद्दा समोर आला होता.

या प्रकरणी झालेल्या ११ सुनावण्यांना बाजार परवानाधारकांनी समाधानकारक प्रतिसाद दिला नसल्याचा ठपकाही ठेवण्यात आला आहे. तपासणी अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या अहवालात व्यापाऱ्यांच्या व्यवहारांवर आवश्यक नियंत्रण नसणे, शेतकऱ्यांच्या थकीत देयकांच्या वसुलीसाठी प्रभावी कार्यवाही न करणे, संबंधित अभिलेखे उपलब्ध नसणे आणि वैधानिक जबाबदाऱ्यांचे पालन करण्यात गंभीर त्रुटी असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

या सर्व बाबींचा विचार करून संबंधित खाजगी बाजार परवानाधारकाने आपल्या वैधानिक जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याने शेतकऱ्यांच्या हिताला बाधा पोहोचल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. त्यानुसार श्री रामेश्वर कृषी मार्केटचा खाजगी बाजार परवाना रद्द करण्यात आला असून, यापुढे या ठिकाणी शेतमालाची खरेदी-विक्री केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, या संदर्भात बाजार समितीच्या संचालक मंडळाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला; मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

कर्मचारी, मजूर आणि स्थानिक व्यवसायांवर परिणाम

या निर्णयामुळे श्री रामेश्वर कृषी मार्केटवर अवलंबून असलेले अनेक कर्मचारी, हमाल, मजूर आणि इतर कामगारांच्या रोजगारावर परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच बाजारपेठेवर अवलंबून असलेले छोटे-मोठे व्यावसायिकही अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांसाठी सोयीस्कर ठरलेले हे बाजार बंद झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांनाही पर्यायी बाजारपेठ शोधण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT