नाशिक : श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त इस्कॉन मंदिरातील मूर्तीभोवती केलेली आकर्षक सजावट.  (छायाचित्र : हेमंत घाेरपडे)
नाशिक

Shri Krishna Janmashtami : ‘हाथी, घोडा, पालकी जय कन्हैयालाल की’

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : शहर, परिसरातील श्रीकृष्ण मंदिरांमध्ये सोमवारी (दि. 26) श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. भाविकांच्या भगवान 'श्रीकृष्ण की जय', 'हाथी, घोडा, पालकी जय कन्हैयालाल की' च्या घोषाने अवघी नाशिक नगरी दुमदुमली होती. याप्रसंगी विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले तर आज मंगळवार (दि. 27) गोपाळकाला साजरा करण्यासाठी परिसरात ठिकठिकाणी दहिहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. आज संध्याकाळी विविध ठिकाणी गोविंदा पथकाचे थरावर थर रचत ही दहिहंडी फोडण्याचा आनंद लूटला जाणार आहे.

कापड बाजारातील पुरातन श्री मुरलीधर मंदिरात सोमवारी (दि. 26) विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. सकाळी ९ ला श्रींच्या मूर्तीला पंचसुक्त पवमान अभिषेक करण्यात आला. ११ ला अमित महाराज संत यांचे श्रींच्या जन्मावरील कीर्तन पार पडले. सायंकाळी प्रसाद गोखले व सहकाऱ्यांनी भजनसंध्या सेवा अर्पण केली. भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती. तपोवनातील केवडीबन येथील स्वामी नारायण मंदिरात कृष्ण जन्माष्टमी उत्सव पार पडला. जुना आडगाव नाका येथील मंदिरात गायक केतग गढिया यांनी भजन-कीर्तनाची सेवा अर्पण केली. गरबा व नंदोत्सव साजरा केला गेला. याशिवाय पाथर्डी फाटा येथील अयप्पा मंदिरात जन्माष्टमीनिमित्त कृष्ण नृत्य, उरियादी, दहीहंडी, गीता श्लोक आदी कार्यक्रम पार पडले. यावेळी मंदिर परिसरातून शोभायात्रा काढण्यात आली. दरम्यान, म्हसरूळ ग्रामस्थांतर्फे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहात लक्ष्मण महाराज कुंडगर (देहु) यांचे कीर्तन झाले.

इस्कॉन मंदिरात गर्दी

द्वारका येथील इस्कॉन मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा केला गेला. यानिमित्त पहाटे 5 पासून मंदिर दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले होते. यावेळी श्री श्री राधा मदनगोपाल यांच्या विग्रहांना नवीन वस्त्र परिधान करताना मूर्तीभोवती आकर्षक सजावट करण्यात आली होती. मंदिरात १२ तास अखंड हरिनाम कीर्तन पार पडले. तसेच पहाटे 5 ला आरती, 6 ला हरे कृष्ण महामंत्र जप, सकाळी ८ ला श्रीमत भागवत प्रवचन झाले. सायंकाळी ५ ते रात्री १२ या वेळेत विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. याप्रसंगी भाविकांनी दर्शनासाठी मंदिरात गर्दी केली होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT