नाशिक : पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त शहर व परिसरातील शिवायले आकर्षक रोषणाई, फुलांनी सजली असून दिवसभर महापूजा, रुद्राभिषेक, महाप्रसाद आदी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कपालेश्वर मंदिरात पंचमुखी मुखवटा पालखी सोहळा होणार असून भाविकांना मुखवटा दर्शनाचा लाभ घेता येणार आहे.
पंचवटीतील हिरावाडी परिसरातील सिद्धेश्वर मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सकाळी महापूजा, रुद्राभिषेक, आरती आदी कार्यक्रम होणार असून भाविकांच्या सुविधेसाठी मंदिर परिसरात मंडप टाकण्यात आला आहे. घारपुरे घाटाजवळील सिद्धेश्वर मंदिरातही विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली असून भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
कपालेश्वर मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. श्रावणमासानिमित्त कपालेश्वर पंचमुखी मुखवटा दर्शनाचा लाभ भाविकांना घेता येणार आहे. या सोहळ्यास १३३ वर्षांची परंपरा आहे. पंचवटी महादेव मुकुटाची वर्षभरात श्रावणी सोमवार, सोमवती अमावस्या महाशिवरात्र या दिवशी पालखी सोहळ्याच्या रुपाने पूजन केले जाते. दुपारी मंदिरात मुखवटा आणून पूजा करुन फुलांनी सजवलेल्या पालखीत त्यास स्थानापन्न केले जाते. दुपारी ४ वाजता सवाद्य मिरवणुकीस सुरुवात हाेणार आहे.
पालखी मालवीय चौक, शनी चौक, राममंदिर पूर्व दरवाजा मार्गे पूढे काळाराम मंदिरात आणली जाते. तिथे श्री काळाराम मंदिराच्या वतीने आरती केली जाते. त्यानंतर पालखी सरदारचौक, मुठे गल्ली, व शनीचौक मार्गे रामकुंड येथे आणली जाते. सायंकाळी ७ वाजता रामकुंडावर मुकुटावर अभिषेक केला जातो.विधिवत महापूजा झाल्यानंतर मुखवटा मंदिरात पुनर्स्थापित केला जातो. श्री मुखवटा कपालेश्वर मंदिरात आणून त्याची विधीवत पूजा होते. दुसऱ्या दिवशी १३३ वर्षांपासून पंचमुखी सेवेचा वारसा असलेल्या वैदय कुुटुंबियांच्या घरी परत नेला जातो. गंगापूर रोडवरील सोमेश्वर महादेव मंदिरातही धार्मिक कार्यक्रम होणा असून भाविकांना दर्शनाचा लाभ घेता यावा म्हणून जय्यत तयारी करण्यात आली आहे.
श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवार व शनिवारी कपालेश्वर मंदिर, रामकुंड परिसरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. २५ जुलै ते २३ ऑगस्टदरम्यान श्रावण मास साजरा होत आहे. वाहतूक मार्गात शहर वाहतूक शाखेच्या युनिट एककडून बदल करण्यात आला आहे. सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत या भागातील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात येणार आहे.
मालेगाव स्टॅण्ड, खांदवे सभागृह, सरदार चौक, ढिकले वाचनालयाकडून श्री कपालेश्वर मंदिराकडे येणारा मार्ग सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद असणार आहे. केवळ पोलिस सेवेतील वाहने, रुग्णवाहिका, शववाहिका, अग्निशमन दलाच्या वाहनांनाच या भागात प्रवेश असणार आहे. हा बदल श्रावण महिन्यातील चारही सोमवार आणि शनिवारसाठी लागू असणार आहे. श्रावण सोमवारनिमित्त श्री कपालेश्वर मंदिरात मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांतील देखील भाविक याठिकाणी येत असतात. त्यामुळे या भागात वाहतूक कोंडीचा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. परिसरात येणाऱ्या भाविकांची कुठलीही गैरसोय होऊ नये, याकरिताच वाहतूक मार्गात बदल करण्यात आल्याचे पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी सांगितले आहे.
पंचवटी : श्रावण महिना सुरू झाल्याने फुलांना बाजारभाव चांगला मिळणार असल्याची आशा शेतकऱ्यांना लागली आहे. तालुक्याच्या पूर्व भागात झेंडूच्या फुलांची तोडणी सुरू झाली आहे.
श्रावण महिना डोळ्यांसमोर ठेवून तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांनी झेंडूच्या फुलांचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले आहे. सध्या झेंडूच्या फुलांना किलोला ५० ते ६० रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत आहे. हा बाजारभाव चांगला आहे. यापुढील सणासुदीच्या दिवसांमध्ये या बाजारभावात आणखी वाढ होणार असल्याचे सांगितले जाते.
सुरुवातीलाच बाजारभाव चांगला मिळू लागल्याने फूल उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत आहे. आडगाव येथील फूल उत्पादक शेतकरी शिवाजी भोर यांनी अडीच एकर क्षेत्रात 'यलो मार्बल' या झेंडूच्या वाणाची लागवड केली आहे. सध्या फुलांची तोडणी सुरू झाली आहे. झेंडूचे पीक मल्चिंग पेपरवर घेतले आहे. यासाठी लाखो रुपयांचे भांडवल त्यांनी गुंतविले आहे.