नाशिक : शहरात गेल्या २४ तासांत तब्बल १० महिला व मुली बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती पोलिस अहवालातून समोर आली आहे. यात अल्पवयीन मुलींपासून विवाहित महिलांपर्यंतचा समावेश असून ही बाब शहरातील सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर ठरत आहे.
पोलीस अहवालानुसार अंबड पोलिस ठाण्यात सर्वाधिक ४ महिला व मुलींच्या बेपत्ता झाल्याची नोंद झाली आहे. तर उपनगरातून २, नाशिकरोड, पंचवटी, सातपूर, इंदिरानगर येथून प्रत्येकी १ अशा पद्धतीने बेपत्ता प्रकरणे नोंदली गेली आहेत. यात उपनगर येथील २४ वर्षीय युवतीने घर सोडण्यापूर्वी वडिलांना “आय एम सॉरी पप्पा…” असा संदेश पाठवून मोबाईल बंद केला,
अंबडमधील २९ वर्षीय महिला कोणाला काही न सांगता घराबाहेर पडली, तर इंदिरा नगर भागातून १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेण्यात आल्याची नोंद आहे. विवाहित महिलांच्या बाबतीत वाद, फूस लावणे तर काही ठिकाणी मानसिक तणाव या कारणांनी त्या बेपत्ता झाल्याचे दिसून आले आहे. शहरातील विविध भागांतून महिलांच्या अशा पद्धतीने मोठ्या संख्येने बेपत्ता होण्याच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिस यंत्रणेसमोर कायदा व सुव्यवस्थेचे तसेच महिला सुरक्षेचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.