क्राइम न्युt Pudhari News Network
नाशिक

धक्कादायक! प्रेयसीला कामावरून काढले; प्रियकराने वृद्धाश्रमच जाळले

Nashik Road : जेलरोड परिसरातील घटना : संशयिताचा पोलिसांकडून शोध

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : 'प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असते' असे जरी म्हटले जात असले तरी, प्रत्यक्षात मात्र 'चुकीला माफी नाही' हेच खरे आहे. जेलरोड परिसरातील एका वृद्धाश्रमात कामास असलेल्या प्रेयसीला व्यवस्थापनाने काढून टाकले. त्याचा राग असलेल्या प्रियकराने वृद्धाश्रमच जाळून टाकले. तसेच वृद्धाश्रमात घुसून धुडगुसही घातला. याप्रकरणी नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून प्रियकराचा शोध घेतला जात आहे.

डॉ. रमेश आनंदराव सोनवणे (रा. काेठारी कन्या शाळेजवळ, जेलरोड) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली असून, ते जेलरोड परिसरातील एस. केअर सेंटरचे व्यवस्थापक आहेत. या सेंटरच्या माध्यमातून शहर व परिसरातील वृद्धांची काळजी घेतली जाते. सेंटरच्या कामाकाजासाठी त्यांनी काहींची नियुक्तीही केली आहे. त्यात एक तरुणी गेल्या काही महिन्यांपासून याठिकाणी कामास होती. तेव्हा तिची ओळख जेलरोड भागात राहणाऱ्या प्रमोद चव्हाण याच्याशी झाली. पुढे ओळखीचे रुंपातर प्रेमात झाले. त्यामुळे प्रमोद चव्हाण हा अधुनमधुन केअर सेंटरमध्ये ये-जा करायचा. मात्र, मागील काही दिवसांपासून दोघांच्या भेटीगाठी जास्तच वाढल्याने डॉ. सोनवणे यांनी संबंधित तरुणी आणि प्रमोदला याबाबत हटकले. तसेच दोघांनाही सूचना देवून सुधारणा करण्यास सांगितले. मात्र, अशातही दोघांच्या भेटीगाठी सुरूच राहिल्या. अखेर डॉ. सोनवणे यांनी संबंधित तरुणीला कामावरून काढून टाकले.

मात्र, याचा प्रमोदला प्रचंड संताप झाला. त्याने केअर सेंटरवाल्यांना धडा शिकवणार असल्याचे प्रेयसीला सांगितले. त्यातून गुरुवारी (दि. २०) पहाटे तीन वाजेच्या सुमारास तो सेंटरमध्ये शिरला आणि धुडघुस घालण्यास सुरुवात केली. त्याने आॅफीसची काच फोडून, जाळी तोडली. तसेच काहीतरी ज्वलनशील पदार्थ ओतून आॅफिसमधील खुर्च्या, कपाट, टेबल, फॅन, इन्व्हर्टर, बॅटरी, सीसीटीव्हीचे मॉनिटर, स्कॅनर, प्रिन्टर व टेबलवर ठेवलेले महत्वाचे कागदपत्रे जाळून टाकले. तसेच तेथून पळ काढला. दरम्यान, पोलिस प्रमोदचा शोध घेत आहेत.

सुदैवाने आश्रित वृद्ध सुरक्षित

प्रमोदने केलेल्या कृत्याची परिसरात एकच चर्चा रंगत आहे. दरम्यान, त्याने कार्यालयात धुडघुस घालून ते जाळले असले तरी, आजुबाजुला आश्रित वृद्ध सुदैवाने सुरक्षित आहेत. मात्र, जाळपोळीमुळे संपूर्ण कार्यालय जळून खाक झाले असून, त्यात अनेक वृद्धांच्या केसफाईल, दरमहा हिशेब व ताळमेळच्या नाेंदी जळाल्या आहेत. याबाबत सीसीटीव्ही फूटेजनुसार तपास सुरु करण्यात आला असून, हवालदार नंदू भाेळे प्रकरणाचा तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT