नाशिक : सोयीपेक्षा गैरसोयीमुळेच सर्वाधिक चर्चेत राहणाऱ्या जिल्हा शासकीय रुग्णालयात शनिवारी (दि.४) चक्क नवजात बाळ चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अवघ्या पाच दिवसांच्या अर्भकाला मातेच्या डोळ्यादेखत चोरी करून पळवून नेल्याने, रुग्णालयाच्या सुरक्षा व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
बाळ चोरुल नेणाऱ्या संशयित महिलेचे हे कृत्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. मात्र, काही सीसीटीव्हीमध्ये बिघाड असल्याने, संशयित महिलेची ओळख पटविण्यात अडचण येत आहे. दरम्यान, या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून, बाळ मातेच्या कुशीत देण्याबरोबरच संशयित महिलेच्या मुसक्या आवळण्याचे मोठे आव्हान नाशिक पोलिस दलासमोर निर्माण झाले आहे.
गुन्हेशाखेची पथके संशयित महिलेच्या मागावर
बाळ चोरीला गेल्याचे समजताच मातेना फोडला हंबरडा
ठक्कर बाजार, सीबीएस, रेल्वेस्थानकांवरही तपास
रुग्णालयाच्या चोहो बाजुकडील सीसीटीव्हीची पडताळणी
सरकारवाडा तांत्रिक विश्लेषण शाखेच्या पथकाकडून तपास
मुळचे उत्तरप्रदेश व सध्या सटाणा परिसरात वास्तव्यास असणाऱ्या शेख कुटुंबातील सुमन अब्दूल खान हिला प्रसववेदना सुरू झाल्याने, शनिवार, दि. २८ डिसेंबर २०२४ रोजी पती अब्दूल याने प्रसूतीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. उपचारानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे २९ डिसेंबर रोजी ही महिला प्रसूत होऊन तिने गोंडस मुलास जन्म दिला. दरम्यान, बाळाची माता प्रसूतीपश्चात कक्षात दाखल असताना, बाळ हे बेबी केअर युनिटमध्ये (कक्ष) हाेते. त्याचवेळी एक संशयित महिला गेल्या चार-पाच दिवसांपासून बाळांतीण महिलेच्या पतीसह तिच्या संपर्कात हाेती. 'माझे नातलग दुसऱ्या वाॅर्डमध्ये ॲडमिट असून, त्यांची सुश्रृषा करण्यासह डब्बा पुरविण्यासाठी मी येत असते' असे सांगत तिने मराठी व हिंदी भाषेचा भडिमार करुन बाळांतीण महिलेशी ओळख वाढविली. याच ओळखीचा गैरफायदा घेत संशयित महिलेने गुटगुटीत बाळ आवडत असल्याने मागील तीन दिवसांपासून हाताळले.
महिलेवर बाळांतीण व तिच्या पतीचा काहीसा विश्वास बसल्याने त्यांना कुठलाही संशय आला नाही. त्यातच बाळ व मातेची प्रकृती ठणठणीत असल्याने दाेघांनाही शनिवारी (दि. ४) दुपारी १२ वाजता डिस्चार्ज देण्याचे जिल्हा रुग्णालयातील परिचारिकांनी सांगितले. त्यानुसार बाळाचे वडील रुग्णालयात डिस्चार्ज व कागदपत्रांची पूर्तता करत हाेते. त्याचवेळी महिला बाळाच्या आईजवळ आली. बाेलणे सुरु असतानाच संशयित महिलेने बाळांतीनीला तुम्ही, 'कपडे व साहित्य आवरा, मी बाळाला सांभाळते व परिसरात फिरवते' असे सांगितले.
मातेचा तिच्यावर विश्वास असल्याने व ताेंडओळखीने तिने बाळ महिलेकडे साेपविले. त्याचेळी बाळाची आई आवरासावर करत असताना महिलेने बाळाच्या आईच्या विश्वासघात करुन काही क्षणांत बाळ चाेरुन पळ काढला. घटनेची माहिती कळताच परिमंडळ एकचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक आयुक्त नितीन जाधव, सरकारवाडा पाेलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुरेश आव्हाड व गुन्हेशाखा युनिट एकचे पथक आले. त्यांनी चाैकशी करुन बाळाचा व महिलेचा शाेध सुरु केला आहे. रुग्णालयातील सीसीटीव्हींची तपासणी केली जात असून, काही सीसीटीव्हीमध्ये संशयित महिला दिसून येत आहे.
पोलिसांनी रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता, त्यात बाळ चोरून नेताना संशयित महिला कैद झाली आहे. मात्र, रुग्णालयाबाहेर पडताना पाठमोरी ती दिसत असल्याने, तिचा चेहरा सीसीटीव्ही अस्पष्ट दिसत आहे. तर काही सीसीटीव्हीमध्ये तांत्रिक बिघाड असल्याचा आरोप दाम्पत्याने केला आहे. या घटनेमुळे जिल्हा रुग्णालयाच्या सुरक्षा व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
संशयित महिला मागील काही दिवसांपासून रुग्णालयात चेहरा झाकून वावरत असल्याचे रुग्णालयातील रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. ही महिला बाळ चोरण्याच्या हेतूनेच रुग्णालयात वावरत होती, हे जवळपास स्पष्ट होत आहे. या कृत्यात ही महिला एकटीच सहभागी आहे की, अन्य कोणी? याचाही पोलिस तपास घेत आहेत.
रुग्ण महिलेने स्वत:हून बाळ संशयित महिलेला हस्तांतरित केले होते. संशयित महिला तीन दिवसांपासून रुग्ण महिलेसोबत होती. ती बाळाचा सांभाळ करीत असल्याचे सीसीटीव्हीत दिसून येत आहे. संशयित महिला रुग्ण महिलेच्या पतीच्या दैनंदिन परिचयाची असल्याचे पोलिस जबाबात म्हटले आहे. त्यामुळे रुग्ण महिला आणि तिचा पती यांना फसवून बाळाची चोरी केल्याचे दिसून येत आहे.डॉ. चारुदत्त शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक. नाशिक.