शिवसेने(उबाठा)च्या निर्धार शिबिरातील 'आम्ही इथेच' चर्चासत्रात शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपल्या अनुभव कथनातून उपस्थित शिवसैनिकांना बळ दिले (छाया : हेमंत घोरपडे)
नाशिक

Shivsena UBT Nashik : आम्ही जगणार, मरणार शिवसेनेसोबतच!

शिवसेने(उबाठा)च्या चर्चासत्रात पदाधिकाऱ्यांचा 'निर्धार'

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : शिवसेनाप्रमुखांनी आमच्यासारख्या गल्लीतील सर्वसामान्य कार्यकर्त्याला दिल्लीपर्यंत पोहोचवले. ८० टक्के समाजकारण, २० टक्के राजकारणाचा मूलमंत्र दिला. त्या शिवसेनाप्रमुखांच्या शिवसेनेसोबत गद्दारी करणे आमच्या रक्तात नाही. आम्ही जगणार आणि मरणारही शिवसेनेसोबतच! कुठे आहे, असा प्रश्न आम्हाला वारंवार विचारला जातो. होय, आम्ही इथेच आहोत, उद्धव बाळासाहेब ठाकरेंसोबत! असा निर्धार शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी हजारो शिवसैनिकांच्या साक्षीने बोलून दाखविला.

शिवसेने(उबाठा)च्या निर्धार शिबिरातील 'आम्ही इथेच' चर्चासत्रात शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपल्या अनुभव कथनातून उपस्थित शिवसैनिकांना बळ दिले. पक्षाचे मुख्य प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी या चर्चासत्राचे संचलन करताना शिवसेना नेते अरविंद सावंत, राजन विचारे, चंद्रकांत खैरे, राजाभाऊ वाजे यांना आपण शिवसेनेत का?, असा सवाल केला. यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्ते गल्ली ते दिल्ली पोहोचू शकला, असे राजन विचारे यांनी नमूद केले. गद्दाराला क्षमा नाही, असे वक्तव्य करणाऱ्या आनंद दिघे यांना काही गद्दार 'हायजॅक' करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही विचारे यांनी केला. आम्ही इथेच आहोत, उद्‌धव बाळासाहेब ठाकरेंसोबत. शिवसेना माझी आई आहे. मी आईजवळच असणार, इथेच जगणार, इथेच मरणार असा दावा खा. अरविंद सावंत यांनी केला.

नाशिकमधून शिवसेना विस्तारल्याचा दाखला देत मराठवाड्याने नाशिक जिल्ह्याचा आदर्श घेतल्याचा दावा चंद्रकांत खैरे यांनी केला. खा. राजाभाऊ वाजे यांनीही समर्पक उत्तरे दिली. शिवसेना फुटल्यावर काही लोक मला उमेदवारीची ऑफर देत होते. परंतु राजकारण संपलं तरी चालेल. पण शिवसेना सोडणार नाही, असा निर्धार मी केला. उद्धव ठाकरे हेच आपले कुटुंबप्रमुख असल्याचे सांगत जोपर्यंत तुम्ही आणि मी आहे तोपर्यंत शिवसेनेत राहील, असा शब्द आपण ठाकरेंना दिल्याची आठवण खा. वाजे यांनी सांगितली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT