नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क | आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये होणाऱ्या शिवसेनेच्या निर्धार शिबिराला खास महत्त्व प्राप्त झाले आहे. नाशिकमधील 35 पैकी 20 माजी नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे विधानसभेत आलेले अपयश व पक्षातील गळती रोखण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी नाशिकपासून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणशिंग फुंकले आहे.
उद्धव ठाकरेंसह युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेही शिबिरात मार्गदर्शन करत आहे. त्यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन होणार असून नाशिक येथील शिवसेना कार्यालयात आदित्य ठाकरे यांचा सत्कार करत असताना व्यासपीठावर मान्यवरांची गर्दी झाली आणि गर्दीमुळे व्यासपीठाचा काही भाग अचानक खचला. त्यामुळे तात्काळ व्यासपीठावरील गर्दी नियंत्रणात आणून गर्दी हटविण्यात येवून बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
आदित्य यांचे भाषण पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करणार आहेत. तसेच सायंकाळी होणाऱ्या शिबिरात शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे यापूर्वी कधी न ऐकलेले भाषण दाखविले जाणार आहे, हे या निर्धार मेळाव्याचे वैशिष्ट्य राहणार आहे. पक्षासाठी कायदेशीर लढाई लढणारे ॲड. असीम सरोदे, खासदार राजाभाऊ वाजे, अरविंद सावंत, विनायक राऊत, चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे मार्गदर्शन करणार आहेत.