इंदिरानगर (नाशिक) : अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने येत्या ५ व ६ जून रोजी किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेकाचा ३५२ वा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे. रायगड किल्ल्यावरील होळीचा माळ या ऐतिहासिक स्थळी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची सजावट करण्याची जबाबदारी यंदा नाशिककरांवर सोपविण्यात आल्याची माहिती स्वराज्य पक्षाचे जिल्हाप्रमुख डॉ. रूपेश नाठे यांनी दिली.
रायगडावर दि. ६ जून रोजी मुख्य राज्याभिषेक सोहळा, ढोल- ताशा पथकांची सादरीकरणे, लेजीम, भवानी तलवारपूजन आणि स्वराज्यनिर्मितीचे दृकश्राव्य सादरीकरण होईल. या सोहळ्यात छत्रपती संभाजी राजे उपस्थितांना संबोधित करणार आहेत. होळीचा माळ या ऐतिहासिक स्थळी छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मूर्ती उभारण्यात येणार आहे.
प्रत्येकाने आपल्या परिसरातील किल्ले, दुर्ग आणि इतर ऐतिहासिक स्थळांचे जतन व संवर्धन करण्याची जबाबदारी स्वखुशीने स्वीकारावी, असे आवाहन जिल्हाप्रमुख डॉ. नाठे यांनी केले. यावेळी केशव गोसावी, विजय खर्जुल, योगेश निसाळ, समाधान जाधव, ललित उशीर आदींसह शिवभक्त उपस्थित होते.