नाशिक : पंचवटीतील शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण शिवजंतीच्या पूर्वसंध्येला मंगळवारी (दि.१८) राज्याचे जलसंपदामंत्री तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन व कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती नाशिक पूर्व मतदारसंघाचे आमदार ॲड. राहुल ढिकले यांनी दिली.
पंचवटी कारंजा येथील शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे. मागिल वर्षभरापासून पुतळा उभारणीचे काम सुरू होते व आता शिवजंयतीच्या पूर्वसंध्येला अनावरण होत असल्याने पंचवटीकरांसाठी अभिमानाची गोष्ट असल्याने पंचवटीकरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याची उंची २२ फूट असून, पुतळ्याची उंची १४ फूट आहे. एकूण ३६ फूट उंचीचा अश्वारूढ पुतळा असणार आहे. हा पुतळा प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांनी साकारला असल्याची माहिती माजी नगरसेवक गुरमित बग्गा यांनी दिली.
अनावरण सोहळ्याप्रसंगी मंत्री गिरीश महाजन, माणिकराव कोकाटे, विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, मनपा आयुक्त मनीषा खत्री यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अनावरण सोहळ्याला शिवप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन माजी नगरसेविका विमल पाटील, नंदिनी बोडके, नरेश पाटील, खंडू बोडके यांनी केले आहे.