छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज बुधवार (दि.19) रोजी शहरभरात मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. Pudhari News Network
नाशिक

Shiv janmotsav 2025 | प्रभो शिवाजी राजा, आज जयंती उत्सव; दुपारी 12 वाजता मिरवणूक

शहर भगवेमय : दिवसभर पोवाडे, देखावे, सामाजिक उपक्रम

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज बुधवार (दि.19) रोजी शहरभरात मोठ्या उत्साहात साजरी होत असून, यानिमित्त संपूर्ण शहर भगवेमय झाले आहे. विविध मंडळे, संस्था, संघटना शिवरायांना मानाचा मुजरा घालण्यासाठी सज्ज झाले असून, पूर्वसंध्येपासूनच जयंतीचा उत्साह सर्वत्र पाहावयास मिळाला.

छत्रपती शिवराय जयंतीनिमित्त मालेगाव स्टॅण्ड, रामवाडी, मखमलाबाद, अशाेक स्तंभ, जिल्हा न्यायालयासमोरील शिवतीर्थ येथील अश्वारूढ पुतळा, शिवाजी रोड, शालिमार परिसर, मुंबई नाका, इंदिरानगर, सिडको, सातपूर, नाशिक रोड, पंचवटी आदी भागांत अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात होते. विविध देखावे, सामाजिक उपक्रम, पोवाडे, शिवरायांचे पराक्रम सांगणाऱ्या गाथा आदी बघावयास मिळत आहे. बुधवारी (दि.19) शिवबाच्या जयंतीचा सोहळा घरोघरी साजरा केला जाणार असून, पूर्वसंध्येला रात्री 12 वाजता अनेक मंडळांकडून फटाक्यांची आतषबाजी करीत उत्सवाला सुरुवात झाली.

सिंहासनाधीश्वर शिवराय

मागील तीन वर्षांपासून अशोक स्तंभ मित्रमंडळाच्या वतीने विक्रमी जयंती साजरी केली जाते. यंदाही महाराजांचा सिहासनाधीश्वर पुतळा उभारला असून, या पुतळ्याची उंची विक्रमी आहे. अतिशय मोहक आणि अप्रतिम अशी मूर्ती साकारण्यासाठी मागील काही दिवसांपासून काम सुरू होते. यंदाच्या जयंती सोहळ्यात महाराजांचे हे रूप नाशिककरांसाठी औत्सुक्याचा विषय ठरले आहे.

दुपारी 12 वाजता निघणार मिरवणूक

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शहरातून भव्य मिरवणूक काढली जाते. यंदाची मिरवणूक बुधवार (दि.19) रोजी दुपारी १२ वाजता वाकडी बारव येथून निघणार आहे. त्यामुळे पोलिसांनी मिरवणूक मार्गातील वाहतूक व्यवस्थेत बदल केला आहे. मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला असून, मोठ्या प्रमाणात पोलिस तैनात करण्यात आले आहेत.

मनाई आदेश लागू

जयंतीच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहवी, यासाठी पोलिसांनी मंगळवारी (दि. १८) रात्री १ पासून मनाई आदेश लागू केला आहे. त्यानुसार शहरात कोणतेही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ, दगड अथवा शस्त्रे सोबत बाळगण्यास मनाई आहे. यासह कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, अशी कोणतीही कृती करण्यास मनाई आहे.

शहरभर होर्डिंग्ज अन‌् भगवे ध्वज

शहरभर होर्डिंग्ज बघावयास मिळत आहे. यातील बहुतांश होर्डिंग्ज राजकारणी मंडळींकडून लावण्यात आली आहेत. तसेच मंडळांकडूनदेखील मोठ्या प्रमाणात होर्डिंग्ज लावली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT