Shirpur Road Protest Dhule 
नाशिक

Shirpur Road Protest Dhule| शिरपूरमध्ये आगळे वेगळे आंदोलन ; रस्त्यावरील खड्ड्यात बसून केली सत्यनारायणाची पूजा

Shirpur Road Protest Dhule| धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात ग्रामस्थांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन करत प्रशासनाचा तीव्र निषेध नोंदविला.

पुढारी वृत्तसेवा

धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात ग्रामस्थांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन करत प्रशासनाचा तीव्र निषेध नोंदविला. संतप्त ग्रामस्थांनी रस्त्यावरील खड्ड्यात बसून सत्यनारायणाची पूजा करून प्रशासनाच्या दुर्लक्षाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मिळालेल्या माहितीनुसार, हाडागेट बॅरलपासून शिरपूरकडे जाणारा रस्ता पुढे मुंबई‑आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ ला जोडला जातो.

या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी प्रशासनाने सुमारे 26 लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याचे सांगितले जाते. मात्र प्रत्यक्षात रस्त्याची दुरुस्ती झालेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

याच पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी प्रशासनाला जाब विचारण्यासाठी आगळेवेगळे आंदोलन उभारले. रस्त्यावरील खड्ड्यात बसून सत्यनारायणाची पूजा करण्यात आली. “निधी मंजूर झाला, पण रस्ता दुरुस्त का झाला नाही? 26 लाख रुपये गेले कुठे?” असा सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, या समस्येबाबत अनेक वेळा निवेदने देण्यात आली तसेच आंदोलनही करण्यात आले. मात्र प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रशासनाची झोप उघडावी आणि प्रश्न तातडीने मार्गी लागावा यासाठी हे अनोखे आंदोलन करण्यात आले.

शिरपूर फर्ट्सच्या वतीने या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली. प्रशासनाने तातडीने रस्त्याची दुरुस्ती करून नागरिकांची समस्या सोडवावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, या अनोख्या आंदोलनामुळे परिसरात मोठी चर्चा रंगली असून प्रशासन आता याकडे कसे लक्ष देते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT