धुळे: शिरपूर येथे एका रिक्षा चालकाच्या सतर्कतेमुळे एटीएम मशीनची चोरी करणाऱ्या दोघांना पोलिसांनी गजाआड करण्यात यश मिळवले आहे. या चोरट्यांनी युट्युब वर एटीएम चोरीची माहिती घेऊन हा प्रकार सुरू केला होता. मात्र शिरपूर पोलिसांच्या जाळ्यात ते अडकले. शिरपूर पोलिसांनी सिने स्टाईल पाठलाग करून गाडी ताब्यात घेतली. त्यानंतर तांत्रिक माहितीच्या आधारावर पळून गेलेल्या या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत .पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी रिक्षा चालक शाहरूख पिंजारी यांचा सत्कार केला आहे.
शिरपुर शहरातील उपजिल्हा रुग्णालय (कॉटेज हॉस्पीटल) समोरील बँक ऑफ बडोदा या बँकेच्या एटीएम समोर एक पीक अप आणि दोन तरुण संशयितरित्या उभे असल्याचे रिक्षा चालक शाहरूख पिंजारी यांच्या निदर्शनास आले रात्री अडीच वाजेच्या सुमारास या दोघा तरुणांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पिंजारी यांनी थेट शिरपूर पोलीस ठाणे आणि डायल 112 क्रमांकावर कळवले.
त्यामुळे शिरपुर शहर पोलीस स्टेशनच्या रात्रगस्त पेट्रोलींग करत असलेल्या अधिकारी व अंमलदार तात्काळ घटना ठिकाणी पोहोचले. पण त्यांना तेथे कोणी आढळुन आले नाही. त्यामुळे पोलीसांनी आजुबाजुला शोध घेत असताना पित्रेश्वर स्टॉप जवळ एक संशयीत पिकअप वाहन आडोशाला उभे असलेले दिसले. परंतु पोलीस वाहन पाहुन आरोपींनी शहादा फाट्याकडे पळ काढला.
आरोपी यांनी प्रथम मुंबई आग्रा महामार्गावर जावुन मध्यप्रदेशकडे जाण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलीसांनी जिल्ह्यातील सर्व पो.स्टे.ला वायरलेसद्वारे माहिती देवुन शिरपुर तालुका व थाळनेर पो.स्टे.यांना ठिकठिकाणी नाकाबंदी लावण्यास सांगीतले. त्यामुळे आरोपींचा मध्यप्रेदशकडे जाण्याचा डाव हुकला. आरोपींनी हाडाखेड येथुन पुन्हा यु टर्न मारुन पोलीसांना चकमा देण्याचा प्रयत्न करुन महामार्गावरुन पुन्हा चोपडा रस्ता पकडुन पळून जाण्याचा प्रयत्न केला. महामार्गावर आरोपींचा शोध घेण्यासाठी थांबलेल्या पोलीसांनी आरोपीच्या वाहनासमोर बॅरिकेट टाकुन त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु ते बॅरीकेट उडवुन दहीवद गावात घुसले. पुन्हा पोलीसांना चकमा देवुन महामार्गावर येवुन चोपडा फाटा येथुन चोपडा गावाच्या दिशेने पळाले.
त्यांच्या मागावर असलेल्या दोन्ही पोलीस वाहनाने आरोपींचा सुमारे 40 ते 45 मिनीटे पाठलाग केला. यात पोनि जयपाल हिरे व सपोनि हेमंत पाटील यांनी त्यांच्या स्टाफसह मदत केली. त्यादरम्यान आरोपी हे पिकअप वाहनासह पळून जात असताना त्यांनी पिकअपला बांधलेली 15 ते 20 फुटाची लोखंडी साखळी रस्त्यावर लोंबकळत होती. त्यातुन घर्षण होवुन ठिणग्या बाहेर पडत असताना शिरपूर पोलीसांनी जिवाची बाजी लावुन पोलीस वाहनाचे टायर संधी मिळेल त्या ठिकाणी पिकअपला बांधलेल्या लोखंडी साखळीवर चढविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आरोपीच्या वाहनाला ब्रेक लागत होता. परंतु पोलीसांचे वाहन अनबॅलन्स होत होते. आरोपींचा पाठलाग चालु असताना पोलीस आरोपींचा पिछा सोडत नाही, असे आरोपींच्या लक्षात आल्याने आरोपी चालु वाहनातुन उडी मारुन पसार झाले. त्यांच्या मागोमाग पोलीस पथक व सहकार्यासाठी आलेले नागरीक यांनी त्यांचा शोध घेतला परंतु ते मिळुन आले नाहीत.
पोनि.किशोरकुमार परदेशी यांनी तात्काळ आरोपीचा शोध घेण्याकरीता पथके तयार केली. पथकाने पिकअप वाहनाची माहिती घेतली असता हे वाहन मुंबई येथील असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलीसांनी तपासचक्र फिरवुन मुळ आरोपी पर्यंत पोहचुन हेमंत सुकलाल माळी ( रा. भिरडई ता. जि.धुळे), व विदुर ऊर्फ विजय देवा जाधव (रा. वसंत नगर, ता. पारोळा जि. जळगाव) यांना ताब्यात घेतले आहे. आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे विचारपुस केली असता त्यांनी मागील काही दिवसात एटीएम मशीन चोरी करणाऱ्या घटनांची यु ट्युबवर माहिती घेवुन त्यासाठी पिकअप वाहन विकत घेतले.
चोरीसाठी लागणारे इतर साहित्य विकत घेतल्याचे सांगीतले. तसेच त्यांनी शिरपुर व्यतीरिक्त धुळे व अंमळनेर येथेही दोर व साखळ दंडाच्या सहाय्याने एटीएम मशीन ओढुन चोरी करण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगीतले. अंमळनेर येथे पंजाब नॅशनल बँकेचे एटीएम मशीन फोडल्यावरुन अंमळनेर येथे भा.न्या.सं. कलम 303 (2) प्रमाणे व धुळे शहर येथील एचडीएफसी बँकेचे दोन एटीएम मशीन फोडल्यावरुन धुळे शहर पो.स्टे. येथे गुन्हा दाखल आहे. गुन्ह्याचा तपास चालु आहे. आरोपी यांना सदर गुन्ह्यात अटक करुन त्यांच्याकडुन पिकअप वाहन जप्त केले आहे. या आरोपींना 5 दिवस पोलीस कोठडी मिळाली आहे.